केंद्र सरकारने पाम, सोयाबीन व सूर्यफूल तेलावरील आयात शुल्कात कपात केल्यानंतर सोलापूरच्या बाजारात खाद्यतेलाच्या दरात प्रतिकिलो सुमारे पाच रुपयांची घट झाली आहे. सध्या सूर्यफूल तेल १७२ रुपये, सोयाबीन १५३ रुपये, तर पाम तेल १६० रुपये प्रतिकिलो दराने विकले जात आहे.
आयात वाढल्यास दर आणखी कमी होण्याची शक्यता असली, तरी सणासुदीत मागणी वाढल्याने दर मोठ्या प्रमाणात घसरणार नसल्याचा व्यापाऱ्यांचा अंदाज आहे.
केंद्राने २४ सप्टेंबरला कच्च्या सूर्यफूल तेलावरील मूलभूत आयात शुल्क १० टक्क्यांवरून शून्य, तर कच्च्या सोयाबीन व पाम तेलावरील शुल्क १० वरून पाच टक्के केले. गेल्या वर्षभरात देशातील वनस्पती तेलाच्या किमतीत सुमारे २० टक्क्यांनी वाढ झाली होती. सप्टेंबर ते नोव्हेंबरदरम्यान गणेशोत्सव, नवरात्र, दसरा व दिवाळीमुळे खाद्यतेलाची मागणी वाढते. त्यामुळे शुल्ककपातीचा परिणाम सणासुदीच्या बाजारावर महत्त्वाचा ठरणार आहे. कच्च्या पाम व सोया तेलावरील एकूण शुल्क १६.५ वरून ११ टक्के, तर कच्च्या सूर्यफूल तेलावरील शुल्क १६.५ वरून ५.५ टक्क्यांवर आले.
शुद्ध पाम व सोया तेलावरील शुल्क ३२.५ वरून २७.५ टक्के, तर शुद्ध सूर्यफूल तेलावरील शुल्क ३२.५ वरून २२.५ टक्के केले आहे. जिल्ह्यात सूर्यफुलाचे सरासरी क्षेत्र ८, २३१ हेक्टर आहे. यंदा ५, ४९२ हेक्टरवर पेरणी झाली आहे. सोयाबीनचे सरासरी क्षेत्र ८१, २७० हेक्टर असून, यंदा १, ३०, ४७३ हेक्टरवर पेरणी झाली आहे. भुईमूग आणि कापूस पिकांनाही पावसाचा फटका बसला आहे. त्यामुळे आयात शुल्ककपातीमुळे तेलाचे दर कमी झाले असले, तरी स्थानिक तेलबिया उत्पादनातील घट हा बाजारासाठी महत्त्वाचा घटक ठरणार आहे.
सोलापुरातील सध्याचे दर (रु. प्रतिकिलो) सूर्यफूल तेल : १७२ सोयाबीन तेल : १५३ पाम तेल : १६०
खाद्यतेल आयातीवरील शुल्ककपातीचा परिणाम सोलापूरच्या बाजारात दिसू लागला असून, दर प्रतिकिलो सुमारे पाच रुपयांनी उतरले आहेत. सणासुदीत मागणी वाढली तरी दर स्थिर राहण्याची शक्यता आहे. मात्र, दुष्काळामुळे तेलबिया उत्पादनावर होणारा परिणाम आणि आयातीत होणारी वाढ यानुसार दर आणखी कमी होऊ शकतात.
– महालिंगप्पा परमशेट्टी, अध्यक्ष, ऑईल मिल असोसिएशन, सोलापूर
कमी आयात शुल्कामुळे नेपाळमधून होणाऱ्या शुद्ध खाद्यतेलाच्या आयातीतील आर्बिट्राजचा फायदा कमी होऊन मोठ्या प्रमाणावरील आयातीला मिळणारे प्रोत्साहन कमी होऊ शकते. कमी आयात खर्चाचा फायदा देशांतर्गत बाजारात हळूहळू दिसून येण्याची अपेक्षा आहे. – डॉ. बी. व्ही. मेहता, कार्यकारी संचालक, महाराष्ट्र ऑईल ट्रेड
