Thursday, April 25, 2024
Homeब्रेकिंगकोल्हापूर जिल्ह्यातील ४ हजार शाळा, महाविद्यालये आजपासून बंद

कोल्हापूर जिल्ह्यातील ४ हजार शाळा, महाविद्यालये आजपासून बंद


कोरोनाच्या तिसर्‍या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी जिल्ह्यातील शाळे, महाविद्यालये सोमवार (दि. 10) पासून बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामध्ये चार हजार शाळा, महाविद्यालये बंद राहतील. मात्र, शिक्षक शाळेतून विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देणार आहेत.

राज्य सरकारने कोरोना संसर्ग रोखण्यासाठी 15 फेब्रुवारीपर्यंत शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हा परिषद व खासगी प्राथमिक अशा मिळून सुमारे 2 हजार 648 शाळा आहेत. यामध्ये 2 लाख 98 हजार 11 विद्यार्थी आहेत. माध्यमिकच्या 1 हजार 68 शाळा असून, 3 लाख 50 हजार विद्यार्थी आहेत. शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रांतर्गत 276 महाविद्यालये असून, 2 लाख 60 हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

विविध शैक्षणिक बोर्डांकडून दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी राबविण्याचे उपक्रम सुरू राहणार आहेत. शालेय शिक्षण विभाग, कौशल्य, उद्योजकता विकास विभाग, तांत्रिक व उच्च शिक्षण विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग, महिला व बालविकास विभाग व अन्य वैधानिक प्राधिकरणांकडून परवानगी दिलेले उपक्रम सुरू असणार आहेत. 15 ते 18 वयोगटातील लसीकरण न झालेले व लसीकरणाची पूर्वनियोजित वेळ दिलेल्या विद्यार्थ्यांना शाळा, महाविद्यालयांत येण्यास परवानगी असणार आहे, असे जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशात म्हटले
आहे.

शिवाजी विद्यापीठ अधिविभाग व संलग्‍नित महाविद्यालये, मान्यता प्राप्‍त संस्थांमधील वर्ग 15 फेब्रुवारीपर्यंत फक्‍त ऑनलाईन पद्धतीने सुरू असणार आहेत. विद्यापीठ अधिविभाग व संलग्‍नित महाविद्यालये, मान्यता प्राप्‍त संस्थांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांची उपस्थिती 50 टक्के ठेवावी, अशा सूचना कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांनी दिल्या आहेत.

जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक शाळांसह महापालिका क्षेत्रातील शाळा सोमवारपासून बंद राहणार आहेत. मात्र, शिक्षक शाळांतून ऑनलाईन शिकवणार असल्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी आशा उबाळे, माध्यमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -