Saturday, April 13, 2024
Homeकोल्हापूरकोल्हापूर जिल्ह्यात आजपासून बूस्टर डोस देणार

कोल्हापूर जिल्ह्यात आजपासून बूस्टर डोस देणार

ताजी बातमी ऑनलाईन टीम

जिल्ह्यात सोमवारपासून (दि. 10) कोरोना प्रतिबंधित लसीचा बूस्टर डोस दिला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात हेल्थकेअर वर्कर्स, फ्रंटलाईन वर्कर्स आणि 60 वर्षांवरील व्याधिग्रस्तांना बूस्टर डोस दिला जाईल. यामध्ये 3 लाख 93 हजार लाभार्थी असतील, असे जिल्हा प्रशासनाने सांगितले.

जिल्ह्यात 16 जानेवारी 2021 पासून लसीकरण सुरू झाले. सुरुवातीला हेल्थ व फ्रंटलाईन वर्कर्सना लस देण्यात आली. त्यानंतर 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक, मग 45 ते 60 वर्षांतील व्याधिग्रस्त, यानंतर 18 वर्षांवरील सर्व नागरिकांना लस देण्यात येऊ लागली. दि. 3 जानेवारीपासून 15 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू आहे.

जिल्ह्यात आजअखेर 18 वर्षांवरील 93 टक्के नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. 18 वर्षांवरील 71 टक्के नागरिकांचे दोन्ही डोससह लसीकरण पूर्ण झाले आहे. लसीकरण पूर्ण झालेल्यांसाठी ज्यांचे दोन डोस घेऊन नऊ महिने अथवा 39 आठवडे पूर्ण झाले आहेत, त्यांना हा बूस्टर डोस दिला जाईल.

बूस्टर डोससाठी ज्या 60 वर्षांवरील नागरिकांनी किंवा हेल्थकेअर व फ्रंटलाईन वर्कर्स यांनी पूर्वी नोंदणी करून पहिला व दुसरा डोस पूर्ण केला आहे त्यांना यासाठी नव्याने नोंदणीची गरज नाही. दुसरा डोस घेऊन 9 महिने किंवा 39 आठवडे पूर्ण झाले असतील, तर ऑनलाईन पद्धतीने किंवा ऑनसाईट सत्राच्या ठिकाणी जाऊन लसीकरण करून घेता येणार आहे. यासाठी आपले पूर्वी दिलेले ओळखपत्र किंवा पहिल्या व दुसर्‍या डोसनंतर मिळलेला संदर्भ क्रमांक व नोंदणीकृत मोबाईल घेऊन जावे लागणार आहे. ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने आपल्या नजीकच्या लसीकरण केंद्रावर बूस्टर डोस घेता येणार आहे.

ज्या हेल्थकेअर वर्कर्स अथवा फ्रंटलाईन वर्कर्स यांचे लसीकरण पूर्वी सामान्य नागरिक या कोट्यातून झाले आहे व त्यांचे वय 60 वर्षांपेक्षा कमी आहे त्यांनी आपल्या खातेप्रमुखांकडून हेल्थकेअर तसेच फ्रंटलाईन वर्कर्स असल्याबाबतचा दाखला दाखवून तशी नोंद करून घ्यावी लागणार आहे. त्यानंतर ते लसीकरण करून घेऊ शकतील.

कोल्हापुरात ‘ओमायक्रॉन’चे आठ रुग्ण आढळले आहेत. रविवारी शहरातील नागाळा पार्क परिसरात चार तर राजारामपुरी, कारंडे मळा, ताराबाई पार्क आणि गांधीनगर येथील प्रत्येकी एकाचे जिनोम सिक्‍वेन्सिंगचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

राजारामपुरी येथील 20 वर्षीय तरुणी मुंबई, तर गांधीनगर येथील 69 वर्षीय वृद्ध महिला दुबई प्रवास करून आली आहे. नागाळा पार्क येथील 29 वर्षीय महिलेला प्रवासाची पार्श्‍वभूमी नाही. तर येथील एकाच अपार्टमेंटमधील अमेरिकेहून आलेल्या 37 वर्षीय महिला, 10 वर्षांची मुलगी, 38 वर्षीय तरुणासह 71 वर्षांच्या वृद्धाचा जिनोम सिक्‍वेन्सिंग अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे परिसरात घबराट पसरली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -