तिसर्या लाटेत कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढू लागल्यानंतर सरकारने 15 फेब्रुवारीपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, हा मुलांवर अन्याय आहे, अशी भूमिका विविध भागांतील शिक्षणतज्ज्ञांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात मांडली आहे. आधीच ऑनलाईन शिक्षणामुळे मुलांच्या प्रगतीची वाट लागली आहे. त्यांना मोबाईलचे व्यसन लागले आहे. त्यातही अनेक मुले अश्लील चित्रफितीही पाहतात. हे अत्यंत गंभीर आहे. त्यामुळे सरकारने शाळा किमान 50 टक्के क्षमतेने तरी सुरू कराव्यात, अशी मागणीही या पत्राद्वारे करण्यात आली आहे.
मॉल्स, हॉटेल्स, सिनेमागृह, नाट्यगृहे आदी सर्व ठिकाणे 50 टक्के उपस्थितीत सुरू ठेवण्याची मुभा दिली. पण शाळा 50 टक्के उपस्थितीत का सुरू ठेवण्यास परवानगी दिली नाही, असा सवाल उपस्थित करत शाळांचा हा निर्णय विद्यार्थ्यांच्या हिताचा नसल्याचे शिक्षणतज्ज्ञांचे म्हणणे आहे.दिवाळीनंतर ते मेअखेरपर्यंत जरी वेळ मिळाला असता, तर प्राथमिक वर्गाचे नुकसान कमी करता आले असते. शाळाबंदी हे शिक्षणाचा अधिकार कायद्याचे सरळसरळ उल्लंघन नाही का, असा सवालही शिक्षणतज्ज्ञांनी केला आहे.