दि. 22 जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे वेण्णा नदीने प्रवाह बदलल्याने वाहून गेलेल्या नांदगणे-पुनवडी दरम्यानचा पूल होणार तरी कधी? असा सवाल या भागातील जनतेने उपस्थित केला आहे.
अतिवृष्टीवेळी वेण्णा नदीचे पात्र बदलल्याने हा पूल अर्धा तुटून वाहून गेला होता. मात्र, 6 महिने उलटून गेले तरी बांधकाम विभागाला हा पूल बांधण्यास मुहूर्त मिळाला नसल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. या पुलावरून प्रवास करताना परिसरातील ग्रामस्थांना आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. नांदगणे ते पुनवडी दरम्यानचा हा पूल वाहतुकीसाठी अत्यंत महत्वाचा पूल असून या पुलावरून पुनवडी, केडंबे, वाळंजवाडी, तळोशी, बाहुळे, भुतेघर, बोंडारवाडी या गावातील ग्रामस्थ दररोज ये-जा करीत असतात.
केळघर व मेढ्याला येणार्या नागरिकांची या पुलावरून नेहमी वर्दळ असते. हा पूल उंच बांधावा, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी वेळोवेळी केली होती. मात्र, अजूनही गांभीर्याने बांधकाम विभाग लक्ष देत नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. एखादा अपघात झाल्यावरच बांधकाम विभागास जाग येईल का? असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.