हसूरचंपू (ता. गडहिंग्लज) येथील औद्योगिक वसाहतीमध्ये रामकृष्ण ऍग्रो केमिकल्स कारखान्याला आग लागली. गुरुवारी पहाटे तीनच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या भीषण आगीत नुकसान झाले. कारखान्यातील कच्च्या मालासह इतर साहित्य जळून खाक झाल्याने सुमारे ७० लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
येथील औद्योगिक वसाहतीमध्ये काजूच्या टरफलापासून तेल करण्याचा कारखाना आहे. काल बुधवारी दोनशे टन कच्चा माल आणला होता. पहाटे टरफलाच्या ढिगार्यावर विजेची ठिणगी पडून आग लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे. सकाळी प्रचंड धुक्यामुळे नेमके काय झाले, हे समजले नाही. बाजूच्या दुसर्या शेडमध्ये कामगार गाढ झोपेत होते. आगीमुळे शेडचा पत्रा तापल्याने कामगारांना जाग आली. गोंधळामुळे लोक गोळा झाले. गडहिंग्लज नगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करुन आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले.