जळगावमध्ये पतंगामुळे दोन किशोरवयीन मुलांनी प्राण गमावल्याच्या चटका लावणाऱ्या दोन वेगवेगवेगळ्या ऐन मकरसंक्रातीदिवशी घटना घडल्या. पहिल्या घटनेत पतंग उडवण्यासाठी जावू दिले नाही म्हणून एका 12 वर्षांच्या मुलाने चक्क गळफास घेऊन आत्महत्या केली. तर दुसऱ्या घटनेमध्ये एका 10 वर्षांच्या मुलाला पतंग काढताना विजेचा धक्का लागल्याने जीव गमावावा लागला. त्यामुळे पंचक्रोशीत एकच खळबळ आहे. मुलांना थोडाफार विरोध केला, तर ते किती टोकाचे पाऊल उचलू शकतात, याची प्रचिती एका घटनेतून आली. तर मुलांना थोडी सूट दिली, तर ते ही जीवावर बेतू शकते, हे समोर आले. त्यामुळे कुठल्या गोष्टीला नकार द्यायचा तरी कसा आणि करायचे तरी काय, असा प्रश्न पालकांना पडलाय. दुसरीकडे नाशिक जिल्ह्यातही गेल्या महिन्यात दोन विद्यार्थिनींनी आत्महत्या केल्याची घटना घडली होती.
मकरसंक्रांत म्हटले की पतंग उडवणे आलेच. खरे तर मुले संक्रांतीच्या कितीतरी दिवशी अगोदर पतंग उडवायला सुरुवात करतात. गल्लोगल्ली पतंग आणि त्यामागे फिरणारी मुले असे चित्र नसते, तर गच्चीगच्चीवर मुले आणि पतंग असे चित्र बहुदा शहरात असते. जिथे मैदाने आणि मोकळी जागा असेल, अशी शहरे यासाठी अपवाद असतात. जळगावमध्येही गेल्या काही दिवसांपासून मुलांची पतंग उडवण्याची धूम सुरूय. त्यात शुक्रवारी कांचननगर येथील यश रमेश राजपूत याला त्याच्या घरातील व्यक्तींना पतंग उडवण्यासाठी बाहेर पाठवले नाही. त्यामुळे रागाच्या भरात त्याने टोकाचे पाऊल उचलले. झोक्याच्या दोरीने गळफास घेत त्याने आपले आयुष्य संपवले. यश अवघ्या 12 वर्षांचा होता. याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे. पोलिसांनी पुढील तपास सुरू केलाय.