वारंवार आवाहन करूनही एसटी कर्मचारी कामावर हजर न राहिल्याने महामंडळाने एसटी कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाईचा बडगा उगारला आहे. संप सुरू झाला होता यावेळी 92 हजार कर्मचारी पटलावर होते, दोन हजार कर्मचाऱ्यांची सेवा समाप्ती झाली होती. तसेच कालपर्यंत 3 हजार 100 कर्मचारी सेवेतून बडतर्फ झाले आहेत, अशी माहिती एसटीच्या व्यवस्थापकीय महासंचालकांनी दिली आहे. तसेच संप केल्यामुळे या काळात तब्बल 5 हजार कर्मचाऱ्यांच्या सेवा समाप्त केल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. साधारण 87 ते 88 हजार कर्मचारी सध्या पटावर आहेत, त्यातील 26 हजार 500 कर्मचारी कामवर असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच शक्यतो बडतर्फ झालेल्या कर्मचाऱ्यांना सेवेत घेणार नाही, ती तेवढी सहज प्रक्रिया नाही, ती क्लीष्ट प्रक्रिया असल्याचे सांगण्यात आले आहे. एसटीचे 37 आगार पूर्ण बंद आहेत, तर उर्वरीत आगार कमी क्षमतेने सुरू आहेत.
जे कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहेत, पण ज्यांचे वय 62 वर्षांच्या खाली आहे, अशा कर्मचाऱ्यांनाही महामंडळ पुन्हा सेवेत रुजू करून घेत आहे, एसटीच्या संपावर तोडगा काढण्यासाठी अनेक बैठका झाल्या तरी संपावर तोडगा निघाला नाही, परिवहन खात्याकडून एसटी कर्मचाऱ्याना ऐतिहासिक 41 टक्के पगारवाढ दिली, त्यांनंतर काही कर्मचारी कामावर हजर झाले, मात्र अजूनही मोठ्या संख्येने कर्मचारी विलीनीकरणाच्या माागणीवर ठाम आहेत. एसटीच्या संपावर तोडगा काढण्यासाठी एसटी संघटनांची बैठक घेत, शरद पवार मैदानात उतरल्याचे दिसून आले. तरीही अजूनही कर्मचारी कामावर हजर राहिले नाहीत. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याच निर्णय महामंडळाकडून घेण्यात आला आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे.