इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बॉम्बे अर्थात आयआयटी बॉम्बे मध्ये ) पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सोमवारी सकाळी विद्यार्थ्याने स्वतःच्या आयुष्याची अखेर केली. हॉस्टेल इमारतीच्या सातव्या मजल्यावरुन उडी मारुन विद्यार्थ्याने जीवन संपवल्याची बातमी एएनआय वृत्तसंस्थेने दिलं आहे. मुंबई पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. विद्यार्थ्याच्या रुममध्ये सुसाईड नोट सापडल्याची माहिती मिळत आहे. नैराश्याने ग्रासलेल्या विद्यार्थ्यावर वैद्यकीय उपचार सुरु असल्याचंही समोर आलं आहे. या घटनेमुळे हॉस्टेल परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून या प्रकरणाचा अधिक तपास मुंबई पोलीस करत आहेत.
“त्याच्या जप्त केलेल्या सुसाईड नोटमध्ये, त्याने सांगितले की त्याला नैराश्याने ग्रासले आहे आणि त्याच्यावर उपचार सुरू आहेत, त्याने आत्महत्येसाठी कोणालाही जबाबदार धरले नाही. पुढील तपास सुरु आहे” अशी माहिती पोलिसांनी दिली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, विद्यार्थी इंजिनिअरिंगमध्ये मास्टर्स करत होता आणि दुसऱ्या वर्षाचे शिक्षण घेत होता.
विद्यार्थ्याने इमारतीच्या सातव्या मजल्यावरुन उडी मारल्याचे समोर आल्यानंतर त्याला तातडीने घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात नेण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. विद्यार्थ्याच्या मानसिक तणावामागे नेमके काय कारण होते, याचाही शोध घेण्याचे प्रयत्न सुरु आहेत.