विराट कोहलीने १५ जानेवारीला कसोटी कर्णधारपद सोडले. या पदावरून तो पायउतार होत असल्याचे त्याने ट्विटकरून जाहीर केले. तो यापुढे कोणत्याही फॉरमॅटमध्ये भारताचे नेतृत्व करणार नाही. त्याच्या या निर्णयानंतर अनेक माजी दिग्गज खेळाडूंनी प्रतिक्रिया दिली आहे. अनेकांनी विराटच्या निर्णयाचे स्वागत केले असून अनेकांनी त्याचा हा निर्णय धक्कादायक होता असे म्हटले आहे.
मागच्या वर्षी विश्वचषक स्पर्धेनंतर कोहलीने टी २० संघाचे कर्णधारपद सोडले. तर द. आफ्रिकेच्या दौ-याआधी बीसीसीआयच्या निवड समितीने वनडे संघाच्या कर्णधारपदावरून त्याची उचलबांगडी केली. द. आफ्रिकेच्या कसोटी मालिकेतील पराभवानंतर कोहलीने कसोटीच्या कर्णधारपदाचाही राजीनामा दिला आहे. कोहलीच्या कर्णधारपदाच्या सुवर्ण कारकिर्दीचा शेवट चांगला झाला नसल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली आहे. द. आफ्रिका संघाला त्यांच्याच भूमीत पराभूत करण्याची संधी त्याच्याकडे होती. पण यात विराट अपयशी ठरला आणि भारताला २-१ ने मालिका गमवावी लागली.