महाबळेश्वर तालुक्यात जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अंबेनळी घाटरस्त्याची पार चाळण झाली होती. हा घाटरस्ता बंद झाल्याने किल्ले प्रतापगड परिसरातील 22 गावांचा संपर्क तुटला होता. शिवाय, अंबेनळी घाटरस्ता कोकणला जोडत असल्याने पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील दळणवळणाची मोठी समस्या निर्माण झाली होती. कडा तुटून अंबेनळी घाटरस्ता धोकादायक बनल्याला तब्बल पाच महिन्यांहून अधिक काळ लोटला आहे. मात्र, शासकीय अनास्थेमुळे घाटरस्त्याची पुरेशी दुरुस्ती न झाल्याने वाहनचालकांना तळहातावर जीव घेऊनच या घाटातून प्रवास करावा लागत आहे.
महाबळेश्वर तालुक्यात जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे प्रतापगड परिसराचे अतोनात नुकसान झाले. अतिवृष्टीच्या मार्यामुळे सह्याद्रीचा डोंगरकडा तुटल्याने अंबेनळी घाटरस्त्याचे रूपांतर एका मोठ्या नाल्यामध्ये झाले होते. या घाटरस्त्यावर 30 हून अधिक छोट्या-मोठ्या दरडी कोसळल्या होत्या. काही ठिकाणी रस्ते दुभंगले होते, तर मेटतळे गावापासून अंदाजे एक ते दोन कि.मी. अंतरावर मुख्य रस्ता 30 फूट खोल खचल्याने वाहतूक पूर्णतः बंद झाली होती. या घाटरस्त्यावरचे मोठमोठे दगड, झाडे, माती उन्मळून खाली आल्यामुळे किल्ले प्रतापगड परिसरातील 22 गावांचा संपर्क तुटला. हाच घाटरस्ता कोकण विभागाला जोडत असल्याने या भागातील नागरिकांची दळणवळणाची मोठी समस्या निर्माण झाली होती. या घाटरस्त्याची कामे युद्धपातळीवर होणे गरजेचे होते; पण तसे घडले नाही.