शुक्रवार पेठ, कोल्हापूर येथील भरकटलेली मुले त्यांच्या कुटुंबाच्या स्वाधीन करण्यास येथील भाजपचे कार्यकर्ते सुभाष पाटील यांना यश आले आणि दुपारपासून मुलांचा शोध घेऊन दमछाक झालेल्या पालकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. या प्रकारात त्या मुलांची भटकण्याची हौस फिटली. परंतु सुभाष पाटील यांना नाहक त्रास झाला.
पोहाळे तर्फ आळते (ता. पन्हाळा) येथील सुभाष पाटील फॅब्रिकेशनचा व्यवसाय करतात. ते कोल्हापूर येथील आपले काम आटोपून बुधवारी (दि. 19) दुचाकीने गावाकडे येत होते. सायंकाळी पाचच्या सुमारास निगवे दुमाला (ता. करवीर) हद्दीत रस्त्याच्या कडेला सात वर्षाची मुलगी व अकरा वर्षांचा मुलगा या दोन शाळकरी मुलांनी त्यांना हात केला. पाटील यांनी गाडी थांबवून चौकशी केली असता त्या मुलांनी आपण चुकून या भागात आलोय, असे सांगितले.प्रथम त्यांनी आपण कुशिरे-निगवे दरम्यानच्या माळावर राहतोय असे सांगितले; पण प्रत्यक्षात त्या रस्त्यावर गेल्यावर त्यांनी आपले नक्की ठिकाण सांगितले नाही. पुन्हा त्यांनी आपण शिंगणापूर (ता. करवीर) येथे राहतोय असे सांगितले.पुन्हा पाटील त्या मुलांना घेऊन शिंगणापूर येथे गेले. तेथील काही खाणाखुणाही त्यांनी सांगितल्या.परंतु तिथे गेल्यावर काही लोक जमा झाले.
या मुलांनी पुन्हा आपण शुक्रवार पेठ, डांगे गल्ली येथे राहत असल्याचे सांगितले. शिंगणापूर येथील पांडुरंग पाटील यांनी शुक्रवार पेठ येथील मित्रांमार्फत चौकशी केल्यानंतरही ही मुले शुक्रवार पेठ येथील खोतलांडे कुटुंबातील असल्याचे समजले. याबाबत खात्री झाल्यानंतर सुभाष पाटील हे मुलांना घेऊन त्यांच्या घरी गेले. त्यांनी त्या मुलांना त्यांच्या आई-वडिलांच्या स्वाधीन केले. त्या मुलांचे आई-वडील दोघेही कामानिमित्त दिवसभर बाहेर असल्याने इतर मुलांच्या संगतीने दुपारी दोनच्या सुमारास घरातून बाहेर पडून भटकण्याच्या उद्देशाने शुक्रवार पेठ येथून पायी चालत या मुलांनी निगवे दुमालापर्यंतचा पल्ला गाठला. मुले सुखरूप घरी आणून सोडल्याबद्दल मुलांच्या आईने कृतज्ञता व्यक्त केली. या प्रकरणात सुभाष पाटील यांना नाहक त्रास झाला असला तरी त्यांनी दाखवलेल्या माणुसकीमुळे त्यांचे भागात कौतुक होत आहे.