आधी भलामोठा दगड डोक्यात घालून तरुणाचा निर्घृण खून केला. त्यानंतर चक्क गुप्तांग जाळून मृतदेहदेखील जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. खुनाची ही घटना शुक्रवारी सकाळी टीव्ही सेंटर भागात उघडकीस आली. सिडको ठाण्याच्या हद्दीत आठ दिवसांमध्ये खुनाची ही दुसरी घटना घडली आहे.
सिद्धार्थ भगवान साळवे (वय-32, वर्षे रा. सिद्धार्थनगर, टीव्ही सेंटर) असे मृताचे नाव आहे. घटनास्थळ हे टीव्ही सेंटर व्यापारी क्रिडा संकुलाच्या पाठीमागील मैदान आहे. सिद्धार्थ हे एका खासगी रुग्णालयात कामाला होते. तसेच ते पेंटर म्हणूनही काम करीत होते. पोलिसांनी मृतदेह घाटीत नेला असून उत्तरीय तपासणी सुरू आहे. सिडको ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
सिद्धार्थ विवाहित असून त्यांना एक मुलगा आहे. दारू पाण्यावरून सिद्धार्थचा सतत पत्नीसोबत वाद व्हायचा, अशी माहिती समोर आली आहे. कुटुंबीय सिडको ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेलेले आहेत.