Sunday, December 22, 2024
Homeक्रीडाUnder-19 World Cup : भारताने ऑस्ट्रेलियाला हरवत फायनलमध्ये प्रवेश

Under-19 World Cup : भारताने ऑस्ट्रेलियाला हरवत फायनलमध्ये प्रवेश

ताजी बातमी ऑनलाईन टीम
आयसीसी १९ वर्षांखालील विश्वकरंडक (Under-19 World Cup) स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात भारताने बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा पराभव करत फायनलमध्ये प्रवेश केला. या सामन्यात भारताने ९६ धावांनी दणदणीत विजय मिळविला. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. सुरुवातीच्या पडझडीनंतर कप्तान यश धुल आणि शेख रशीद यांच्या द्विशतकी भागीदारीच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियाला २९१ धावांचे आव्हान दिले आहे. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना भारताचे लक्ष्य पेलवले नाही. १९४ धावांवर भारताने कांगारुंना गुंडाळले. भारत आता इंग्लंडविरुद्ध ५ फेब्रुवारीला अंतिम सामना खेळणार आहे.

भारताने दिलेल्या २९१ धावांचे आवाहन घेवून मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलिया सलामीवीर कॅम्पबेल केलावे आणि टीग वायली यांनी डावाची सुरुवात केली. पण रवी कुमारने (१) वायलीला स्वस्तात बाद करत कांगारूंना पहिला धक्का दिला. त्यानंतर आलेल्या कोरी मिलरसोबत केलावेने अर्धशतकी भागीदारी केली. अंगक्रिश रघुंवशीने ही भागीदारी मोडली. त्याने मिलरला (३८) पायचीत पकडले. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा डाव घसरला, त्यांनी १०१ धावांवर पाच फलंदाज गमावले.

भारताच्या विकी ओसवालने पुन्हा आपला खेळ बहरवत ऑस्ट्रेलियाचे कंबरडे मोडले. त्याने शुल्झम आणि स्नेलला बाद करत कांगारूंच्या विजयाच्या आशा संपुष्टात आणल्या. ४१.४ षटकात ऑस्ट्रेलियाचा डाव १९४ धावांवर संपुष्टात आला. ओसवालने ३ तर रवी कुमार आणि निशांत सिद्धूला प्रत्येकी २ बळी मिळाले.

तपुर्वी, कर्णधार यश धूलने (110) व शेख रशिद (94) याच्यासोबत तिसर्‍या विकेटसाठी केलेल्या द्विशतकी (204 धावा) भागीदारीच्या बळावर भारतीय युवा संघाने अंडर 19 वर्ल्डकप स्पर्धेच्या दुसर्‍या सेमिफायनलमध्ये ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 291 धावांचे टार्गेट ठेवले.

नाणेफेक जिंकून भारताने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत 5 बाद 290 धावा काढल्या. हरनूर सिंग व अंगकृश रघुवंशी यांनी डावाची संथ सुरुवात करताना पहिल्या सहा षटकांत 14 धावा फलकावर लावल्या. रघुवंशी 6 धावांवर बाद झाला. त्यानंतर हरनूर सिंगही 16 धावांवर परतला. यामुळे भारताची 2 बाद 37 अशी स्थिती झाली, तर 16 व्या षटकात भारताचे अर्धशतक पूर्ण झाले.

कर्णधार यश धूल व शेख रशिद यांनी सावधपणे फलंदाजी करताना संघाला 25 षटकांत 2 बाद 86 धावांपर्यंत मजल मारून दिली. संघाचे शतक 28 व्या षटकात पूर्ण झाले. यावेळी यश धूल 35, तर रशिद 32 धावांवर खेळत होते. धूलने कर्णधारपदास साजेशी फलंदाजी करताना 64 चेंडूंत आपले अर्धशतक पूर्ण केले. याबरोबरच यशने रशिदसोबत तिसर्‍या विकेटसाठी शतकी भागीदारीही पूर्ण केली. कॅनोलीच्या गोलंदाजीवर एकेरी धाव घेत शेखने संघाचे दीडशतक 36 व्या षटकात पूर्ण केले. शेखने 79 चेंडूंत 2 चौकारांसह आपले अर्धशतक पूर्ण केले.

यश व रशिदने शानदार फलंदाजी करत संघाचे द्विशतक 42 व्या षटकात पूर्ण केले. धूलने हिटनेच्या गोलंदाजीवर दुहेरी धाव घेत आपले शतक पूर्ण केले. त्याने शतकी खेळी 106 चेंडूंत 10 चौकारांच्या मदतीने पूर्ण केले. याबरोबरच धूलने शेखसोबत द्विशतकी भागीदारीही पूर्ण केली. मात्र, धाव घेण्याच्या प्रयत्नात धूल 110 धावांवर बाद झाला.

त्याने शेखसोबत तिसर्‍या गड्यासाठी 204 धावांची भागीदारी साकारत संघाला सुस्थिती प्राप्‍त करून दिली. मात्र, पाठोपाठ शेखही 94 धावांवर बाद झाला. हंगरगेकरही 13 धावांवर बाद झाला. शेवटी निशांत सिद्धू (नाबाद 12) व दिनेश बाना (4 चेंडूंत नाबाद 20 धावा) यांनी जोरदार फटकेबाजी करत भारताला 5 बाद 290 अशी भक्‍कम स्थिती प्राप्‍त करून दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -