भारताने वेस्ट इंडिज विरुद्ध टी 20 सीरीजमध्ये दमदार सुरुवात केली आहे. कोलकात्याच्या इडन गार्डन्स स्टेडियमवर काल टी 20 मालिकेतील पहिला सामना झाला. टी 20 च्या पहिल्या लढतीत भारताने वेस्ट इंडिजवर सहा गडी राखून सहज विजय मिळवला. वनडे प्रमाणे भारताने टी 20 सीरीजची चांगली सुरुवात केली आहे. भारत दौऱ्यावर आलेल्या वेस्ट इंडिजचा हा सलग चौथा पराभव आहे. या सामन्यात भारताला अनुकूल असं सर्व घडलं. पण तरीही दोन घटनांमुळे टीम इंडियाचं टेन्शन थोडं वाढलं आहे. वेस्ट इंडिजचा कॅप्टन कायरन पोलार्डने टेन्शन देण्याचं काम केलं. त्याच्या दोन शक्तीशाली फटक्यांमुळे टीम इंडियाचे दोन खेळाडू दुखापतग्रस्त असून ते पुढच्या सामन्यांना मुकू शकतात.
कायरन पोलार्डमुळे वेगवान गोलंदाज दीपक चाहर आणि वेंकटेश अय्यर दोघे दुखापतग्रस्त झाले आहेत. पोलार्ड या सामन्यात मोठी खेळी खेळला नाही. त्याने फक्त 24 धावा केल्या. पण त्याच्या या छोटया खेळीने टीम इंडियाला टेन्शन दिलं आहे. वेस्ट इंडिजच्या डावाच्या शेवटी पोलार्डने दोन असे फटके खेळले, ते रोखताना दीपक चाहर आणि वेंकटेश अय्यरला दुखापत झाली. 17 व्या षटकात पोलार्डने लाँग ऑनच्या दिशेने एक मोठा फटका खेळला. तिथे वेंकटेश अय्यर उभा होता. चेंडू इतका वेगात आला की, वेंकटेशच्या हातातून निसटून थेट सीमारेषेपार गेला. चेंडूचा वेग इतका होता की, वेंकटेशच्या बोटांना मार बसला. तो दुखापतीने विव्हळत होता.