काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी आज सकाळी फक्त एका ओळीचे ट्वीट करून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर शरसंधान साधले. या फोटोमध्ये मालेगाव बॉम्बस्फोटातील संशयित आरोपी कर्नल प्रसाद पुरोहित असल्याचे समजते. 29 सप्टेंबर 2008 रोजी मालेगावमध्ये बॉम्बस्फोट झाला होता. शुक्रवारच्या नमाजानंतर मशिदीत मोटारसायकलवर बॉम्बस्फोट झाला होता. यामध्ये 6 जणांचा मृत्यू झाला होता, तर 100 हून अधिक लोक जखमी झाले होते. याप्रकरणी एटीएसने प्राथमिक चौकशी केली होती. तीन वर्षांनंतर 2011 मध्ये हे प्रकरण एनआयएकडे वर्ग करण्यात आले. भोपाळमधील भाजप खासदार प्रज्ञा ठाकूर याही या प्रकरणात आरोपी होत्या. या प्रकरणातील अन्य आरोपींमध्ये लेफ्टनंट कर्नल पुरोहित, मेजर (निवृत्त) रमेश उपाध्याय, सुधाकर द्विवेदी आणि समीर कुलकर्णी यांचा समावेश आहे. याप्रकरणाची सुनावणी अजूनही सुरू आहे.
नेमकं ट्विट काय?
काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी आज गुरुवारी सकाळी 9 वाजून 41 मिनिटांनी एक व्हिडिओ ट्वीट केला आहे. त्या ट्वीटमध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस कुठल्यातरी कार्यक्रमात आहेत. त्यावेळी एक व्यक्ती येऊन फडणवीसांशी काहीतरी बोलतो. त्यानंतर फडणवीस सुहास्य करतात. मान डोलावतात. क्षणार्धात उठून उभे राहतात. समोर एक पांढरा शर्ट घातलेली व्यक्ती येते. ते त्यांच्याशी शेकहँड करतात. त्या व्यक्तीचा चेहरा व्हिडिओत अर्धवट दिसतोय. शक्यतो, ती व्यक्ती मालेगाव बॉम्बस्फोटातील संशयित आरोपी कर्नल पुरोहित असावी. त्यावरून सचिन सावंत यांनी या व्हिडिओला शेलक्या शब्दात फक्त एका ओळीचे टॅगलाइन दिलीय. ते इतकंच म्हणतायत की, बहुत याराना लगता है. या ओळीनंतर त्यांनी पश्नार्थक चिन्ह असलेल्या चेहऱ्याची स्माइली टाकलीय.
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण देशभरात गाजले. विशेषतः येथूनच पुढे हिंदू दहशतवादाचा मुद्दा अनेकांनी उचलला. त्यामुळे अजूनही काँग्रेस असो की राष्ट्रवादी यावरून भाजपवर शरसंधान साधायची संधी सोडत नाहीत. आताही सावंत यांनी तेच केले आहे. यावर विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस काय उत्तर देतात, हे पाहणे उत्सुकतेचे आहे. शिवाय हा व्हिडिओ कधीचा आहे, याचा उल्लेख सावंत यांनी ट्वीटमध्ये काहीच केला नाही. त्यामुळे त्यावर उलट-सुलट प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.