बाळासाहेब थोरात काय, दिलीप-वळसेपाटील आणि मी असेल, आम्हीही मराठ्यांच्या पोटचे आहोत. आम्हालाही मराठा समाजाला आरक्षण द्यायचं आहे. आरक्षण खोळंबून ठेवायला आम्हाला काय आनंद वाटतो का? असा सवाल करतानाच मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. त्यासाठी आमचा प्रयत्न आहे. काही कायद्याच्या अडचणी आहेत. त्यातून मार्ग काढूनच आम्ही पुढे जात आहोत, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मराठा आरक्षणाची मागणी करणाऱ्या तरुणांना खडसावले. शिवनेरी येथे शिवजयंतीच्या सोहळ्यावेळी ते बोलत होते. यावेळी अजित पवार यांचं भाषण सुरू असताना काही तरुणांनी मराठा आरक्षणाची मागणी केली. त्यामुळे अजित पवारांच्या भाषणात व्यत्यय आला. तेव्हा अजितदादांनी या कार्यकर्त्यांना कडक शब्दात झापले.
शिवनेरी येथे शिवजयंतीचा सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी अजित पवार यांनी जनतेला संबोधित केलं. इतर समाजाला दिलेल्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण देण्याचा आम्ही नियम केला. सर्व आमदारांनी तसा ठराव केला. 288 आमदारांनी ठराव केला. पण काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजे. कायदा आणि सर्वोच्च न्यायालय सर्वोच्च आहे. काही राज्यात वेगवेगळं आरक्षण मागितलं जातं.
बाळसााहेब थोरात, सीताराम कुंटे, मुख्यमंत्री आणि मी असे चारपाचजण पंतप्रधानांना भेटलो. आम्ही पंतप्रधानांकडे 12 मागण्या केल्या. त्यातील मराठा आरक्षणाची पहिली मागणी होती. पंतप्रधानांनी चर्चा करण्याचं आश्वासन दिलं होतं, असं अजित पवार यांनी सांगितलं.