ताजी बातमी ऑनलाइन टीम
नांदेड (Nanded) जिल्ह्यामध्ये लग्नाच्या वऱ्हाडावर काळाने घाला घातलाय. नांदेडमधील (Nanded Accident) भोकर ते किनवट रस्त्यावर लग्नाचे वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या टेम्पो आणि ट्रकला भीषण अपघात (Tempo And Truck Accident) झाला. सोमठाणा पाटीजवळ ही घटना घडली असून यामध्ये नवरीसह 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर नवरदेवासह सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. सोमवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास हा अपघात झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जारीकोटमधील धर्माबाद येथील नवरदेव नागेश साहेबराव कन्नेवाड यांचे उमरखेड तालुक्यातील पूजा पामलवाड हिच्यासोबत 19 फेब्रुवारी रोजी लग्न झाले होते. लग्नानंतर हे वऱ्हाड आज मांडवा परतणीसाठी जारीकोट येथून साखरा येथे जात होते. त्याचदरम्यान भोकर तालुक्यातील सोमठाणा पाटीजवळ वऱ्हाडाला भीषण अपघात झाला. समोरुन येणाऱ्या ट्रकने लग्नाचे वऱ्हाड असलेल्या टेम्पोला जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये दोन्ही गाड्यांचा चक्कारचूर झाला आहे.
या अपघातामध्ये नवरी पूजा पामलवाड (20 वर्षे), माधव सोपेवाड (30 वर्षे), दत्ता पामलवाड (22 वर्षे), सुनील थोटे (30 वर्षे) यांच्यासह 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या अपघातामध्ये नवरदेव नागेश कन्नेवाड याच्यासह सुनीता टोकलवार (40 वर्षे), गौरी चोपलवाड (दीड वर्षे), अविनाश टोकलवार (36 वर्षे), अभिनंदन कसबे (12 वर्षे) हे सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी (Nanded Police) घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांच्या मदतीने जखमींना नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर मृतांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. या अपघातामुळे नवरी आणि नवरदेवाच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.