ताजी बातमी ऑनलाइन टीम
मराठा समाजाच्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या आमरण उपोषणाला इचलकरंजी सकल मराठा समाजाने जाहीर पाठिंबा जाहीर केला आहे. त्याचबरोबर इचलकरंजीतील शिवतीर्थ येथे २६ फेब्रुवारी रोजी एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे. शिवाय २६ फेब्रुवारीला आझाद मैदानात सुरू होणा-या उपोषणास इचलकरंजीतून मोठ्या संख्येने मराठा बांधव जाणार आहेत, असा निर्णय मंगळवारी झालेल्या मराठा समाजाच्या बैठकीत घेण्यात आला.
दरम्यान, या बैठकीमध्ये संभाजीराजें बद्दल के ले ल्या आक्षेपार्ह विधानाबद्दल राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांचा निषेध नोंदवण्यात आला. महाराष्ट्रातच नव्हे तर अखंड देशात छ. उदयनराजे भोसले व छ. संभाजीराजे यांच्या विरोधात कोणीही आक्षेपार्ह विधान केल्यास त्याना मराठा समाज हिसका दाखवेल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
खासदार संभाजीराजे यांनी मराठा समजाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आणि सरकारकडून मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्याकडे होत असलेल्या दुर्लक्षामुळे २६ फेब्रुवारी पासून बेमुदत उपोषणाला बसण्याची घोषणा केली आहे. राज्यभरातून या उपोषणास मराठा समाजाने पाठिंबा दिला असून हजारोंच्या संख्येने आंदोलक आझाद मैदानावर दाखल होणार आहेत. या पार्श्वभूमीवर मंगळवारी इचलकरंजी सकल मराठा समाजाची बैठक पार पडली. त्याच अनुषंगाने २६ फेब्रुवारी – रोजी शिवतीर्थ येथे सकाळी वाजल्यापासून लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे.
आणि संभाजीराजे छत्रपती यांनी केलेल्या प्रमुख मागण्यांचा पाठपुरावा संदर्भात प्रांताधिकारी यांना निवेदनही देण्यात येणार आहे. बैठकीस पुंडलिक जाधव, आबा जावळे, पै. अमृत भोसले, संतोष सावंत, मोहन मालवणकर, अमरजित जाधव, शशिकांत मोहिते, किसन शिंदे, नितीन लायकर, स्वप्निल पाटील, सचिन वरपे, भारत बोंगार्डे, प्रमोद खुडे, युवराज मोहिते, गणेश नेमिष्टे, सखाराम खराडे व समाज बांधव उपस्थितत होते.