उगवत्या आणि मावळत्या सुर्याचे फोटो कॅमेरात कैद करण्याची हौस अनेकांना असते. मात्र दरी-खोऱ्यात जाऊन निसरड्या वाटांवर बाळगलेली हलगर्जी अंगलट येण्याची शक्यता असते. सूर्यास्ताचे असेच अनोखे क्षण कॅमेरात टिपण्याच्या नादात तरुण गंभीर जखमी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. महाबळेश्वरमधून दिसणारे नयनरम्य सनसेटचे छायाचित्र काढण्याचा मोह 14 वर्षीय मुलाला चांगलाच महागात पडला. फोटो काढताना दरीत कोसळून हा अल्पवयीन मुलगा दुखापतग्रस्त झाला आहे. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर या थंड हवेच्या ठिकाणी असलेल्या लॉडविक पॉईंटला ही धक्कादायक घटना घडली आहे. सुदैवाने महाबळेश्वर ट्रेकर्स आणि सह्याद्री ट्रेकर्सने शर्थीचे प्रयत्न करुन युवकाला बाहेर काढले.
महाबळेश्वर मधील लॉडविक पॉइंटवर फोटो काढताना 14 वर्षीय तरुण दरीत कोसळला. आदित्य जाधव असे त्या युवकाचे नाव आहे. या अपघातात तो गंभीर जखमी झाला आहे.
दरीत पडून युवक जखमी
सनसेट दृश्याचे फोटो काढताना तोल जाऊन अचानक तो दरीत कोसळला होता. या घटनेची माहिती मिळताच महाबळेश्वर ट्रेकर्स आणि सह्याद्री ट्रेकर्सने शर्थीचे प्रयत्न करून युवकाला बाहेर काढले. जखमी युवक अवस्थेत असल्याने त्याला पुढील उपचारासाठी पुणे येथे खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
जीव धोक्यात घालू नका
दरी-खोऱ्यात ट्रेकिंगला जाऊन धोकादायक सेल्फी किंवा फोटो काढण्याचा हल्ली ट्रेण्ड आला आहे. सोशल मीडियावर अधिकाधिक लाईक्स मिळवण्याच्या प्रयत्नात अनेक हौशी ट्रेकर्स नसती धाडसं करुन फोटोग्राफी करतात. मात्र पर्यटकांनी धोका पत्करुन अशी कुठलीही कृत्य करु नयेत, ज्यामुळे तुमच्या जीवावर बेतेल, असे आवाहन पोलीस आणि महाबळेश्वर पालिका प्रशासनाने केले आहे.