वेस्ट इंडिज विरुद्ध टीम इंडियाने 3-0 ने टी 20 सीरिज जिंकली आहे. वेस्ट इंडिजचा दारूण पराभव करणारे टीम इंडियाच्या विजयाचे दोन हिरोच संघातून बाहेर झाले आहेत. भारत विरुद्ध श्रीलंका टी 20 सीरिज सुरू होत आहे. ही सीरिज 24 फेब्रुवारीपासून खेळवण्यात येणार आहे. आता या सीरिजआधी टीम इंडियाचं टेन्शन वाढलं आहे.
टीम इंडियातील दीपक चाहर आणि सूर्यकुमार यादव काही कारणामुळे संघातून बाहेर झाले आहेत. श्रीलंका टीम विरुद्ध सामन्यात ते मैदानात खेळताना दिसणार नाहीत. या दोघांनाही आराम देण्यात आला आहे. वेस्ट इंडिज विरुद्धच्या टी 20 सामन्यात दोघांनीही उत्तम कामगिरी केली होती
वेस्ट इंडिज विरुद्ध तिसऱ्या टी 20 सामन्यात सूर्यकुमार यादवला दुखापत झाली होती. तो अजूनही या दुखापतीमधून पूर्णपणे बरा होऊ शकला नाही. त्यामुळे तो श्रीलंके विरुद्ध टी 20 सामन्यात खेळणार नाही अशी माहिती मिळाली आहे.
सूर्यकुमार यादवने वेस्ट इंडिज विरुद्ध 3 टी 20 सामन्यांमध्ये 107 धावा केल्या. त्याला प्लेयर ऑफ द सीरीज पुरस्काराने गौरवण्यात आलं. तिसऱ्या टी 20 सामन्यात त्याने 65 धावांची खेळी केली. त्यामध्ये 7 षटकार ठोकले होते. त्याच्या धडाकेबाज फलंदाजीमुळे टीम इंडियाच्या विजयाचा मार्ग अधिक सोपा झाला.
सूर्यकुमार यादवची दुखापत किती गंभीर आहे? तो मैदानात कधी परतणार याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही. सूर्यकुमारच्या हाताला हेयरलाइन फ्रॅक्चर आहे. त्यामुळे साधारण 5 ते 6 आठवडे त्याला पूर्ण बरे होण्यासाठी लागू शकतात अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.