ताजी बातमी ऑनलाइन टीम
इचलकरंजीत आज बुधवारी सुमारे पाच लाख रुपयांची चोरी झाल्याची घटना घडली. सदरची घटना येथील सांगली रोडवर असणाऱ्या इलाज मला परिसरात घडली. यामध्ये चोरट्यांनी बंद घराचा कडी-कोयंडा उचकटून चोरट्यांनी 1 लाख 40 हजाराची रोकड आणि सव्वा दोन लाखाचे सहा तोळे सोन्याचे दागिने असा 3 लाख 63 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे.
याबाबतची फिर्याद भुपेंद्र रमेशचंद्र केसरवाणी (वय 41 रा. येलाज मळा मूळ रा. अलाहाबाद उत्तरप्रदेश) यांनी गावभाग पोलिसात दिली आहे.
भूपेंद्र केसरवाणी हे मूळचे अलाहाबाद येथील असून सध्या ते इचलकरंजीतील येलाज मळा येथे वास्तव्यास आहेत. त्यांचा केटरर्सचा व्यवसाय आहे. बुधवारी केसरवाणी यांच्या घरात कोणी नसल्याने घर बंद होते. याचा फायदा चोरट्यांनी उचलला आणि आज सकाळी 11 ते दुपारी 2.30 या वेळेत बंद घराच कडी-कोयंडा उचकटून आत प्रवेश केला.
आत प्रवेश करताच हॉलमधील लोखंडी तिजोरीतील ड्रॉवरमध्ये ठेवलेल्या सोन्याच्या पाच अंगठ्या, दोन चेन, दोन जोड टॉप्स, एक बंगाली डुल असे 2 लाख 23 हजार 880 रुपयांचे 57.98 ग्रॅम वजनाचे दागिने आणि 1 लाख 40 हजार रुपयांची रोकड असा 3 लाख 63 हजार 880 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. या घटनेची माहिती मिळताच गावभाग पोलिस ठाण्याचे निरिक्षक राजू ताशिलदार हे सहकार्यांसह घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान सदरच्या चोरीने परिसरात मोठी घबराहट निर्माण झाली आहे