विधानसभा निवडणुकांच्या प्रचारासाठी आज शिवसेना नेते संजय राऊत आणि आदित्य ठाकरे उत्तर प्रदेशाच्या दौऱ्यावर आहेत. येथील शिवसेना उमेदवारांच्या प्रचारासाठी आदित्य ठाकरे यांच्या दोन जाहीर सभा आयोजित करण्यात आल्या. यावेळी उत्तर प्रदेशातील भाजप सरकारवर आदित्य ठाकरे यांनी कडाडून टीका केली. उत्तर प्रदेशातील जनता विद्यमान सरकारच्या नेतृत्वावर समाधानी नसून येथे केवळ दंगे आणि द्वेषाची भाषा पसरवली जात आहे. त्यामुळे या राज्यात परिवर्तनाची लाट येणे आवश्यक असून शिवसेनेचे उमेदवार हेच परिवर्तनाचं प्रतीक आहे, असं वक्तव्य आदित्य ठाकरे यांनी केलं. या भाषणात बोलताना आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्रातील शेतकरी आंदोलनाचा उल्लेख केला. चार वर्षांपूर्वी महाराष्ट्रात भाजपसोबत शिवसेना सत्तेत असताना शेतकऱ्यांनी आंदोलन केलं.
तेव्हा या शेतकऱ्यांना नक्षलवादी म्हटलं गेलं, आमच्यातीलच काही लोकांनी शेतकऱ्यांना असं म्हटल्याबद्दल आम्हाला अजूनही खंत वाटते, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. उत्तर प्रदेशातील शेतकरी आंदोलनाचीही हीच स्थिती झाली असून आता यात बदल आवश्यक असल्याचं त्यांनी म्हटलं.
उत्तर प्रदेशातील सभेत बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, ‘ 3-4 वर्षांपूर्वी महाराष्ट्रातही शेतकऱ्यांनी आंदोलन छेडलं होतं. शेतकरी बंधू-भगिनी मुंबईकडे येऊ लागले. एक विशाल मोर्चा येऊ लागला. तेव्हाच्या सरकारमध्ये शिवसेनादेखील होती. त्यावेळी आमच्याकडून खूप चुका झाल्या. पण आता आमचं महाविकास आघाडीचं सरकार आहे. त्यावेळी शेतकऱ्यांना काय काय म्हणलं गेलं. त्यांचा झेंडा लाल होता. त्यांचं रक्त लाल होतं. त्यांना माओवादी, नक्षलवादी, दहशतवादी म्हटलं गेलं. पण ते शेतकरी होते, आपल्या हक्कांसाठी लढत होते. त्याच गोष्टी इथे घडल्या. लखीमपूरची घटना कुणी विसरलंय का? या गोष्टींमुळे खूप जखमा झाल्या आहेत, हीच स्थिती बदलण्याची गरज आहे, असं वक्तव्य आदित्य ठाकरे यांनी केलं.