स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने एफआरपीचे तुकडे पाडणाऱ्या शासन आदेशाची होळी येथील तहसीलदार कार्यालयासमोर करण्यात आली. मंत्रालय सचिव व राज्य शासनाने काढलेल्या दोन टप्प्यांतील अध्यादेशाची होळी करून जोरदार घोषणाबाजीसह राज्य शासनाचा तीव्र निषेध करण्यात आला. यावेळी तहसीलदार प्रदीप उबाळे यांना निवेदन देण्यात आले.
स्वाभिमानीचे नेते भागवत जाधव म्हणाले, सरकार कारखानदारांना सोबत घेऊन शेतकऱ्यांच्या एकरकमी एफआरपी मिळण्याच्या हक्कावर दरोडा टाकण्याचे काम करीत आहे. एकरकमी एफआरपी कायदा केंद्र सरकारने मंजूर केला आहे. राज्य शासनाला या कायद्यात मोडतोड करण्याचा अधिकार नाही. याची किंमत राज्य सरकारला मोजावी लागेल.
यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य अप्पासाहेब पाटील, प्रभाकर पाटील, प्रवासी वाहतूक संघटनेचे तानाजी साठे, शहराध्यक्ष अनिल करळे, प्रताप पाटील, राजाराम परीट, रमेश पाटील, जयवंत पाटील, अशोक बल्लाळ, एकनाथ निकम, लक्ष्मण डुके, रवींद्र रोकडे उपस्थित
होते.