ताजी बातमी ऑनलाइन टीम
मराठा आरक्षण आणि मराठा समाजाच्या प्रमुख मागण्यांसाठी खासदार संभाजीराजे छत्रपती (SambhajiRaje Chatrapati) यांनी शनिवारपासून मुंबईतील आझाद मैदानात आमरण उपोषणाला (Hunger Strike) सुरुवात केलीय. संभाजीराजे यांच्यासह आझाद मैदानात शेकडो कार्यकर्त्यांनीही उपोषणाला बसले आहेत. इतकंच नाही तर राज्यभरातही विविध संघटना या उपोषणात सहभागी झाल्या आहेत. अशावेळी माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी भाजपची भूमिका स्पष्ट केलीय. संभाजीराजे यांच्या उपोषणाला भाजपचा पाठिंबा असल्याचं त्यांनी जाहीर केलंय. त्याचबरोबर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तात्काळ हस्तक्षेप करुन संभाजीराजेंचं उपोषण सोडवावं, असं आवाहनही फडणवीस यांनी केलंय.
“केवळ आणि केवळ नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण घालविणार्या महाविकास आघाडी सरकारने विविध मागण्यांबाबत आतातरी गंभीर व्हावे. युवराज संभाजीराजे छत्रपती यांना अखेर उपोषणाचा मार्ग पत्करावा लागला. त्यांच्या मागण्यांना आमचे पूर्ण समर्थन आहे आणि आम्ही त्यांना पाठिंबा देतो. महाविकास आघाडी सरकारने मराठा बांधवांच्या संयमाचा अंत पाहू नये. केवळ वेळकाढू धोरण अवलंबू नये. भारतीय जनता पार्टी या लढ्यात मराठा बांधवांसोबत आहे. मुख्यमंत्र्यांनी तत्काळ हस्तक्षेप करून युवराज संभाजीराजे छत्रपती यांचे उपोषण सोडवावे!”, असं ट्वीट करत फडणवीसांनी संभाजीराजेंच्या उपोषणाला भाजपचा पाठिंबा जाहीर केलाय.
सरकारनं शब्द पाळला नाही म्हणून उपोषण- संभाजीराजे
दरम्यान, ‘मराठा आरक्षण कधी मिळेल हे सांगता येत नाही. त्यासाठी वेळही लागू शकतो. पण आम्ही सात मागण्या केल्या होत्या. त्यापैकी एकही मागणी पूर्ण झाली नाही. 15 दिवसात या मागण्या मंजूर करतो म्हणून सरकारने सांगितलं होतं. पण आजतागायत त्यावर तोडगा निघाला नाही. त्यानंतर रायगड आणि नांदेडला आंदोलन करूनही सरकारने त्याची दखल घेतली नाही. सरकारने शब्द पाळला नाही. त्यामुळे उपोषणाशिवाय माझ्याकडे काहीच पर्याय राहिला नाही. म्हणूनच मी आजपासून उपोषणाला बसलो आहे’, असं खासदार संभाजी छत्रपती यांनी स्पष्ट केलं.