दाऊद इब्राहिम मनी लाँड्रिंग प्रकरणात राज्याचे अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्या अडचणीत वाढ होत चालली आहे. नवाब मलिक यांचे भाऊ कप्तान मलिक यांना ईडीने समन्स बजावल्यानंतर आता त्यांच्या मुलाला देखील ईडीने समन्स बजावला आहे. फराझ मलिक यांना ईडीने समन्स पाठवले आहे. फराझ मलिक हे आजच ईडी कार्यालयात चौकशीसाठी येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांवर सक्तवसुली संचालनालय म्हणजेच ईडीकडून धाडसत्र सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना ईडीने (ED) आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी मागच्या बुधवारी अटक केली होती. नवाब मलिक यांच्या घरावर पहाटे सहा वाजत धाड टाकून ईडीचे अधिकारी त्यांना चौकशीसाठी कार्यालयात घेऊन गेले. आठ तासांच्या चौकशीनंतर नवाब मलिक यांना अटक करण्यात आली. या अटकेमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. नवाब मलिकांना याप्रकरणी कोर्टाने 3 मार्चपर्यंत ईडीची कोठडी सुनावली आहे.
ईडीच्या कोठडीत एक रात्र काढल्यानंतर अचानक नवाब मलिकांची प्रकृती बिघडली होती. त्यामुळे त्यांना तात्काळ जे. जे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. आता नवाब मलिक यांची प्रकृती बरी झाली असून त्यांना आजच जे. जे रुग्णालातून डिस्चार्ज मिळाला आहे. आज सकाळी 10 वाजता त्यांना ईडी कार्यालयात परत नेण्यात आले. आता नवाब मलिकांचा मुलगा फराझ मलिक यांना देखील ईडीने समन्स बजावला आहे. त्यामुळे नवाब मलिक यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.