रशिया आणि युक्रेनचे युद्ध आता वाटाघाटीच्या मार्गावर आले आहे. दोन्ही देशात चर्चेने मार्ग काढण्यावर सहमती झाली आहे. मात्र दुसरीकडे युक्रेनने गाफील न राहता, दुसरा प्लॅनही तयार ठेवला आहे. रशिया आणि युक्रेन यांच्यातील बैठकीपूर्वी युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी सांगितले की, बैठकीत युद्धविरामाचा प्रस्ताव ठेवला जाईल. रशियन लष्कराने युक्रेनमधून आपले सैनिक मागे घ्यावेत. परिस्थिती पाहता रशियाने तात्काळ युद्धविराम जाहीर करावे, अशी मागणी त्यांच्याकडून करण्यात आलीय. रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे आतापर्यंत दोन्ही देशांचे मोठे नुकसान झाले आहे. या युद्धामुळे मोठ्या संख्येने लोक देश सोडून गेले आहेत. त्याचवेळी रशियाने आता युक्रेनमधील अनेक छोटी शहरे ताब्यात घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे युक्रेन युद्धाचा अनुभव असणाऱ्या कैद्यांना युद्धभूमिवर रशियाविरोधात उतरवण्याच्या तयारीत आहे.
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष म्हणाले, आत्ताच्या परिस्थितीत आपल्यातील प्रत्येकजण योद्धा असल्याचे दाखवून दिले आहे. सर्व योद्धे त्यांच्या जागी आहेत आणि मला खात्री आहे की आपल्यापैकी प्रत्येकजण जिंकेल. शियाविरुद्धच्या लढाईत सामील व्हायचे असल्यास युक्रेन लष्करी अनुभव असलेल्या कैद्यांची सुटका करेल, असे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी म्हटले आहे. झेलेन्स्की यांचे हे विधान अशा वेळी आले आहे, जेव्हा रशिया आणि युक्रेन यांच्यात बेलारूसमध्ये चर्चा होत आहे. यासाठी युक्रेनचे शिष्टमंडळ बेलारूसला पोहोचले आहे. दोन्ही देश वाटाघाटीच्या टेबलावर आहेत. या संवादातून युद्धाच्या समाप्तीची घोषणा होऊ शकते, असा अंदाज लावला आहे. युद्ध समाप्तीची घोषणा झाल्यास फक्त युक्रेनलाच नाही तर जगाला मोठा दिलासा मिळू शकतो.