ताजी बातमी ऑनलाइन टीम
महागाईमुळे (inflation) सर्वसामान्य जनता आधीच त्रस्त झाली आहे. त्याता आता देशवासीयांची सर्वात जास्त पसंती असलेल्या अमूल दुधाच्या किमतीत वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वासामान्यांच्या खिशाला आणखी कात्री लागणार आहे. अमूल दुधाच्या किमतीमध्ये प्रति लीटर दोन रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. 1 मार्च म्हणजेच मंगळवारपासून ही नवीन दरवाढ लागू होणार आहे.
अमूल गोल्ड (Amul Gold) अर्धा लीटर दुधासाठी 30 रुपये, अमूल ताजा अर्धा लीटरसाठी 24 रुपये आणि अमूल शक्ती अर्धा लीटरसाठी 27 रुपये मोजावे लागणार आहे. गुजरात सहकारी दूध वितरक संघाने दूध दरवाढीचा निर्णय घेतला आहे. दूध दरवाढीला एक वर्ष पूर्ण होण्याआधीच ही दरवाढ करण्यात आली आहे. यापूर्वी जुलै 2021मध्ये अमूल दुधाच्या दरात वाढ करण्यात आली होती.
उत्पादन खर्च वाढल्यामुळे ही दरवाढ करणे आवश्यक असल्याचे गुजरात सहकारी दूध वितरक संघाने सांगितले आहे. दूध उत्पादनाच्या किमतीत मोठी वाढ झाल्यामुळे साधारण 8 महिन्यांमध्ये पुन्हा एकदा दुधाची दरवाढ करण्यात आली आहे. अमूल दुधाच्या सर्वच ब्रँडसाठी ही दरवाढ लागू असणार आहे. यामध्ये अमूलच्या टी स्पेशल, सोना, ताजा, शक्ती याशिवाय गायी आणि म्हशीच्या दुधाच्या दरात देखील वाढ करण्यात आली आहे.
दरम्यान, अमूलने दरवाढीबाबत सांगितले की, दोन रुपये ही फक्त चार टक्क्यांची वाढ आहे. जी अन्नधान्याच्या सरासरी महागाईपेक्षा खूपच प्रमाणात कमी आहे. एनर्जी, पॅकेजिंग, ट्रान्सपोर्ट आणि जनावरांच्या चाऱ्याच्या सरासरी महागाईमुळे दूध उत्पादनाच्या खर्चामध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे एकूण खर्च वाढला आहे. त्यामुळे अमूल दुधाच्या दरात वाढ करण्यात आली आहे. महत्वाचे म्हणजे कंपनीने सांगितले की, अमूल दुधाच्या खरेदीवर पैसे दिलेल्या प्रत्येक रुपयांमध्ये जवळजवळ 80 पैसे हे शेतकऱ्यांना परत दिले जातात.