रशियाने लष्करी हल्ला केल्यामुळे युक्रेन देश मोठ्या संकटात सापडला आहे. युक्रेनमध्ये युद्धामुळे परिस्थिती बिकट होत चालली आहे. युक्रेनमध्ये जगभरातील अनेक देशांचे विद्यार्थी अडकले आहेत. भारताचे देखील 20 हजारांपेक्षा अधिक विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले होते. यामधील अनेक विद्यार्थी मायदेशी परतले आहेत तर अनेकांनी युक्रेनच्या सीमा पार केल्या आहेत. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्यासाठी मोदी सरकारकडून जोरदार प्रयत्न सुरु आहेत. या विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी मोदी सरकारकडून ऑपरेशन गंगा सुरु आहे. आता युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांसाठी केंद्र सरकारने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. युक्रेनमधील ज्या विद्यार्थ्यांचा पासपोर्ट हरवला आहे त्यांनी काळजी करण्याचे कारण त्यांनी त्यांच्यासाठी केंद्र सरकारने महत्वपूर्ण निर्णय घेतला असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरमिंदम बागची यांनी सांगितले.
ज्या विद्यार्थ्यांचे पासपोर्ट हरवले किंवा गहाळ झाले आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी भारत सरकारकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरमिंदम बागची यांनी दिली आहे. अरमिंदर बागची म्हणाले की, युक्रेनमध्ये अडकलेल्या ज्या भारतीय नागरिकांचा पासपोर्ट हरवला आहे त्यांनी काळज करण्याची गरज नाही. ज्यांचा पासपोर्ट हरवला आहे अशा भारतीय नागरिकांना आपत्कालीन प्रमाणपत्र देण्यासाठी यंत्रणा तयार करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. तसंच, केंद्राच्या या निर्णयामुळे अनेक भारतीय विद्यार्थ्यांनाही मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
युक्रेनमध्ये 20 हजारांपेक्षा अधिक भारतीय विद्यार्थी अडकले होते याबद्दल बागची यांनी सांगितले की, ‘त्यापैकी जवळपास 17 हजार भारतीय नागरिकांनी युक्रेनच्या सीमा सोडल्या आहेत.’ तसंच, युक्रेनमध्ये अडकलेल्या नागरिकांना सुखरुप बाहेर काढण्यासाठी आम्ही पूर्व युक्रेनमध्ये पोहोचण्याचे पर्याय शोधत असल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या 24 तासांमध्ये 6 उड्डाणं भारतामध्ये पोहचली असून या विमानांमधून 3,352 भारतीय युक्रेनमधून भारतामध्ये परतले आहेत, असं देखील ते म्हणाले.
दरम्यान, युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी केंद्र सरकारने ऑपरेशन गंगा सुरू केले आहे. या ऑपरेशनअंतर्गत भारत सरकारने युक्रेनमध्ये अडकलेल्या नागरिकांना मदतीसाठी नियंत्रण कक्ष देखील स्थापन केले आहेत. याशिवाय युक्रेनच्या सीमेला लागू असलेले देश रोमानिया, हंगेरी, पोलंड आणि स्लोव्हाक रिपब्लिकमध्ये देखील नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. या नियंत्रण कक्षातून युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांशी संपर्क केला जात आहे.