चंदगड तालुक्यातील म्हाळेवाडी गावाचे सरपंच चाळोबा आप्पाजी पाटील यांना रस्त्यात अडवून अज्ञात व्यक्तींकडून लोखंडी गज आणि बेदम मारहाण करण्यात आली. म्हळेवाडीहून हलकर्णी फाट्यावर येत असताना त्यांच्यावर हा खूनी हल्ला करण्यात आला आहे. या हल्ला नेमका कशासाठी आणि कुणी केला याबद्दल अजून काही स्पष्ट झाले नाही. चंदगड तालुक्याचे आमदार राजेश पाटील यांच्याच गावातील सरपंचावर बुधवारी (दि. २) सायंकाळी खुनी हल्ला करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात या घटनेची जोरदार चर्चा करण्यात येत आहे.
हल्ल्यात सरपंच चाळोबा पाटील गंभीर जखमी झाल्याने त्यांना तातडीने बेळगावमधील केएलई रुग्णलायत दाखल करण्यात आले आहे. सहा मारेकऱ्यांनी त्यांच्यावर खुनी हल्ला करतच लोखंडी गजाने त्यांना बेदम मारहाण करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांच्या पायाला, हाताला आणि कंबरेला गंभीर दुखापत झाली आहे. मारकऱ्यांनी बेदम मारहाण करुन त्यांना रस्याजवळ असलेल्या शेतात तसेच टाकून गेले होते. या घटनेची माहिती म्हाळेवाडी ग्रामस्थांना समजताच त्यांनी तातडीने केएलई रुग्णालयात दाखर केले.
म्हाळेवाडीमध्ये महाशिवरात्रीनिमित्त दिवसभर वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये सरपंच व्यस्त होते, हा कार्यक्रम झाल्यानंतर ते जेव्हा हलकर्णीला जाण्यासाठी निघाले तेव्हा कोवाड-माणगाव रस्त्यावर चाळोबा पाटील यांची वाट बघत थांबलेल्या एका व्यक्तीने त्यांना पेट्रोल कुठे मिळेल अशी विचारणा करत त्यांना बोलण्यात गुंतवून ठेवले, ते त्या व्यक्तीबरोबर बोलत असतानाच मागून पाच जणांनी येऊन त्यांच्यावर लोखंडी गजाने वार केले. या हल्ल्यात त्यांच्या पायाला आणि पाठीला गंभीर दुखापत झाली आहे. याप्रकरणाची नोंद चंदगड पोलिसात झाली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक कळेकर करत आहेत. या हल्ल्यामागील नेमके सूत्रधार कोण आहेत याबाबत अजून काहीही समजू शकले नाही. त्यामुळे हल्ला कुणी आणि का केला याचा तपास सुरु आहे.