पुणेकरांची प्रतीक्षा अखेर संपली असून आजपासून पुणे मेट्रो त्यांच्या सेवेत आली आहे. दुपारी तीननंतर पुणेकर मेट्रोने प्रवास करु शकणार आहेत. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महत्त्वाकांक्षी अशा पुणे मेट्रोचे उद्घाटन करण्यात आले. पंतप्रधानांनी गरवारे महाविद्यालयाजवळील मार्गिकेचं उद्घाटन केले. त्याचसोबत त्यांच्या हस्ते पिंपरी ते फुगेवाडी या मेट्रो मार्गाचे देखील उद्घाटन करण्यात आले. आजपासून या दोन्ही मेट्रो पुणेकरांच्या सेवेत आल्या आहेत. त्यामुळे मेट्रोने प्रवास करण्यासाठी पुणेकर खूपच उत्सुक आहेत. मेट्रोने प्रवास करण्यापूर्वी तिकीटाचे दर माहिती असणे खूपच गरजेचे असून आज आपण पुणे मेट्रो तिकीटाचे दर जाणून घेणार आहोत…
पुणे मेट्रोचा एक मार्ग वनाझ ते रामवाडी या दरम्यानचा आहे. हा मार्ग 13 किलोमीटरचा असून त्यापैकी वनाझ ते गरवारे हा 5 किलोमीटरचा मार्ग तयार झाला आहे. तर दुसरा मार्ग पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट असा आहे. हा मार्ग 12 किलोमीटरचा असून त्यापैकी पिंपरी-चिंचवड ते फुगेवाडी या 7 किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे. या दोन्ही मार्गाचे आज मोदींच्या हस्ते उद्घाटन झाले. उद्घाटनानंतर पुणे मेट्रो ही पुणेकरांच्या सेवेत आली आहे. पुणे मेट्रोने यासंदर्भात ट्वीट करत माहिती दिली आहे. सध्या या दोन्ही मेट्रो तीन डब्यांच्या असणार आहेत आणि प्रत्येक डब्यात 325 प्रवाश्यांना प्रवास करण्याची क्षमता असणार आहे. तीन डब्यांमधील एक डबा महिलांसाठी राखीव असणार आहे.