शेतकऱ्यांच्या बांधापासून ते राज्य विधीमंडळातील अधिवेशनापर्यंत सध्या कृषीपंपाचा विद्युत पुरवठा खंडीत या एकाच विषयाची चर्चा होत आहे. केवळ चर्चा होत असून अद्यापपर्यंत कोणताही तोडगा निघालेला नसताना आता शेतकरी नेते आंदोलनाची भूमिका घेत आहेत. गेल्या 10 दिवसांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी हे कृषीपंपांना 10 तास आणि तो ही दिवसा विद्युत पुरवठा सुरळीत व्हावा या मागणीसाठी बेमुदत आंदोलन करीत आहेत तर दुसरीकडे आता जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष यांनीही मोहळमध्ये आमरण उपोषण सुरु केले आहे. गेल्या काही दिवसांपासून महावितरणने कृषीपंपाबाबत घेतलेली भूमिका ही चूकीची असून यामध्ये शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. बांधावरची स्थिती निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न शेतकरी संघटना करीत पण यावर कोणताही ठोस निर्णय झालेला नाही.
रब्बी हंगामातील पिके ऐन बहरात आहेत. हंगामाच्या अंतिम टप्प्यात पाणी मिळाले तर उत्पादनात वाढ होणार आहे पण कृषी पंपाचा विद्युत पुरवठाच खंडीत केला जात असल्याने पिकांना पाणी देणे मुश्किल झाले आहे. शिवाय गेल्या काही दिवसांपासून उन्हामध्ये वाढ झाल्याने पिके कोमेजून जात आहेत. दरवर्षी रब्बी हंगामातच अशी भूमिका घेतली जात असल्याने याचा थेट परिणाम उत्पादनावर होत आहे. यंदा तर पाणीसाठा मुबलक असून त्याचा पुरवठा करणे मुश्किल झाले आहे.