शिवसेना उपनेते आणि स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरावर आयकर विभागाने धाड मारल्याची घटना ताजी असतानाच शिवसेनेच्या आणखी एका नेत्याच्या घरी छापेमारी सुरू आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय आणि युवासेनेचे पदाधिकारी राहुल कनाल यांच्या घरी आयकर विभागाने छापा मारला आहे. आज सकाळीच आयकर विभागाचे एक पथक कनाल यांच्या घरी पोहोचले आणि त्यांनी छापेमारीस सुरू केली. यावेळी केंद्रीय राखीव दलाच्या जवानांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. विशेष म्हणजे शिवसेना नेते संजय राऊत यांची आज दुपारी पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेत त्यांनी तपास यंत्रणांचा भ्रष्टाचार उघड करणार असल्याचं जाहीर केलं आहे. त्यापूर्वीच शिवसेना नेत्याच्या घरी आयकर विभागाने धाड मारल्याने एकच खळबळ उडाली आहे.
आज सकाळी आयकर विभागाने शिर्डी देवस्थानचे ट्स्टी आणि युवा सेनेचे पदाधिकारी राहुल कनाल यांच्या घरी छापा मारला. आयकर विभागाचे एक पथक कनाल यांच्या वांद्रे येथील भाभा हॉस्पिटलच्या गल्लीतील नाईन अल्मेडा इमारतीतील कनाल यांच्या घरी आले आणि त्यांनी झाडाझडती सुरू केली आहे. यावेळी कनाल यांच्या इमारतीखाली सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांचा बंदोबस्त ठेवला आहे. राहुल कनाल हे घरी आहेत की नाही याची माहिती मिळू शकली नाही. तसेच हे धाडसत्रं किती दिवस चालेल याचीही काही माहिती मिळू शकलेली नाही.
शिवसेना नेते संजय राऊत यांची आज पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेत ते केंद्रीय यंत्रणांचा भ्रष्टाचार उघड करणार आहेत. मात्र, आज आयकर विभागाने शिवसेनेच्या नेत्याच्या घरी छापा मारून शिवसेनेची कोंडी केली असल्याचं बोललं जात आहे. विशेष म्हणजे राऊतांच्या पीसी आधी भाजपचा रेड प्लान होणार असल्याचंही काल बोललं जात होतं. त्यानंतर आज आयकर विभागाने धाडसत्रं सुरू केल्याने तर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत.
राहुल कनाल हे उद्योजक आहेत. ते युवा सेनेचे पदाधिकारी आहेत. तसेच आदित्य ठाकरे यांचे ते निकटवर्तीय मानले जातात. या शिवाय शिर्डी देवस्थान समितीवर ते पदाधिकारीही आहेत.