ताजी बातमी ऑनलाईन टीम
कौटुंबिक वादातून लाकडी दांडक्याने हल्ला करून पत्नीचा अमानुषपणे खून केल्याची घटना पाचगाव (ता. करवीर) येथील हायस्कूल चौकात मंगळवारी (दि. ८) रात्री घडली. अरुणा विजय पवार (वय २८) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.
करवीर पोलिसांनी रात्री उशिरा हल्लेखोर पती विजय पवार याला ताब्यात घेतले आहे. कर्नाटकातील हादनाळ (ता. चिकोडी) येथील पवार दाम्पत्य एक वर्षापासून पाचगाव येथील मध्यवर्ती चौकात असलेल्या हायस्कूल चौकाजवळ प्रशांत पाटील यांच्या घरात भाड्याने राहतात. संशयित विजय पवार हा सेंट्रींग चे काम करतो. आठवड्यापासून पती-पत्नीमध्ये वादावादी सुरू होती.
दाम्पत्याला पाच वर्षाचा मुलगा आहे. मंगळवारी सकाळी त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर सायंकाळच्या सुमारास दोघांमध्ये पुन्हा वादावादी झाली. संतप्त विजय पवार याने लाकडी दांडक्याने पत्नीवर हल्ला केला. डोक्यावर झालेल्या वर्मी हल्ल्यात पत्नीचा जागीच मृत्यू झाला. रक्ताच्या थारोळ्यात पत्नी मृत अवस्थेत पडलेली होती. दोन तास संशयित पत्नीच्या मृतदेहाजवळ बसून होता.
रात्री त्याने नागरिकांना आपण पत्नीचा खून केल्याचे सांगितले. नागरिकांनी तात्काळ पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पतीला ताब्यात घेतले आहे. भर चौकात झालेल्या खुनाच्या घटनेमुळे चौकात प्रचंड गर्दी झाली होती. रात्री उशिरा विजय पवार याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.