महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षेतील घोटाळा दिवसेंदिवस अधिक व्यापक होत चालला आहे. या घोटाळ्यात समावेश असलेल्या अनेक आरोपींना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे. 2019-20 परीक्षेमध्ये जी. ए. सॉफ्टवेअरचा प्रीतीश देशमुख याने इतरा एजंटसोबत संगनमत करुन तब्बल 7 हजार 880 अपात्र परीक्षार्थींना पैसे घेऊन त्यांना पात्र केले. त्यातील एका एजंटाकडील तब्बल 1 हजार 126 अपात्र परीक्षार्थींना पात्र केलेल्या सायबर पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. टीईटी परीक्षा 2019-20 मधील अंतिम निकालात 16 हजार705 परीक्षार्थींना पात्र केले होते. त्यापैकी नाशिक विभागामधील अपात्र परीक्षार्थींना पात्र करण्याची संख्या 2 हजार770 इतकी असून ती इतर कोणत्याही विभागाच्या तुलनेत जास्त असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
या प्रकरणातील मुख्य आरोपी पैकी एक असलेल्या मुकुंद जगन्नाथ सूर्यवंशी (वय 33, रा. मालेगाव, जि. नाशिक) याला अटक सायबर पोलिसांनी अटक केली आहे. सूर्यवंशी याला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला 14 मार्चपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली. आरोपी सूर्यवंशी हा शिक्षक असून यातील एक आरोपी राजेंद्र सोळुंके व मुकुंद सूर्यवंशी हे दोघेही एकाच गावचे राहणारे आहेत अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
आरोपी संतोष हरकळकडून जप्त केलेल्या लॅपटॉपमधील माहितीच्या आधारे 1270 परीक्षार्थीची नावे, सीटनंबर, जात अशी नोंद असलेली एक्सेल शीट पोलिसांना मिळाली आहे. त्याच्यावरून 1270 ० परीक्षार्थीची यादी पैकी 1126 परीक्षार्थीचे गुण वाढविण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. आता या यादीतील कोण कोणत्या परीक्षार्थींना मुकुंद सूर्यवंशी याने संपर्क केला होता याचा शोध पोलीस घेत आहेत.