गेल्या दोन दिवसांपासून राज्यात पुन्हा अवकाळीचा फटका रब्बी हंगामातील पिकांना आणि फळबागांना बसत आहे. नाशिक जिल्ह्यात कांदा आणि द्राक्षबागांचे नुकसान झाल्यानंतर आता अवकाळीने (Kokan) कोकणाकडे कूच केलेली आहे. या भागात रब्बी हंगामाचे नाही पण (Mango) आंबा आणि काजूच्या बागांना धोका निर्माण झालेला आहे. सकाळपासून उकाडा आणि दुपारुन हवेत गारवा निर्माण होऊन वादळी वाऱ्यासह सुरु झालेल्या पावसामुळे आंबागळ तर काजू बागांची पडझड सुरु झाली आहे. हंगामाच्या सुरवातीपासून आंबा बागांवर अवकाळीची अवकृपा राहिली असून अंतिम टप्प्यातही कायम आहे. आता होत असलेले नुकसान न भरुन निघणारे आहे. यापुर्वीच वातावरणातील बदलाचा परिणाम उत्पादनावर झालेला आहे. असे असतानाच बुधवारी सायंकाळी सुरु झालेल्या पावसाने शेतकऱ्यांपुढे अजून कोणते संकट मांडून ठेवले हाच सवाल प्रत्येकाच्या मनात आहे.
सिंधुदुर्ग शहरासह परिसरात बुधवारी दुपारी वादळी वाऱ्यासह पावसाला सुरवात झाली होती. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजाप्रमाणे वातावरणात बदल होऊन विजेच्या कडकडाटासह पाऊस झाला. अवघ्या अर्ध्यातासाच्या या पावसामुळे रस्त्यावर पाणी-पाणी झाले तर दुसरीकडे वाऱ्यामुळे आंबा गळतीचा धोका कायम आहे. आता कुठे आंबा पीक पदरात पडेल असे चित्र होते होते पण अगदी अंतिम टप्प्यात झालेल्या या पावसामुळे आंबा उत्पादक शेतकऱ्यांचे न भरुन निघणारे नुकसान झाले आहे.