महापालिका प्रशासनाने कोल्हापूर शहरातील 2075 घरफाळा थकबाकीदारांना जप्तीपूर्व नोटिसा बजावल्या आहेत. मात्र, घरफाळा थकबाकीदारांनी या जप्तीच्या नोटिसांना केराची टोपली दाखवली आहे.
यूक्रेनमधील भारतीय विद्यार्थांना या देशात पूर्ण करता येणार शिक्षण, PM मोदींनी मानले आभार
संबंधित थकबाकीदारांनी अद्यापही घरफाळा भरलेला नाही. त्वरित थकबाकी न भरल्यास त्यांच्या मिळकतीवर बोजा चढविण्यात येणार आहे. गेल्या दोन वर्षांत कोरोना कालावधीतही महापालिकेने अहोरात्र सेवा-सुविधा पुरवल्या आहेत. परंतु, या कालावधीत शासनस्तरावर लॉकडाऊन घोषित झाल्याने आर्थिक उलाढाल ठप्प झाली होती. त्यामुळे मालमत्ता कर (घरफाळा) वसुलीवरही त्याचा परिणाम झाला. महापालिकेच्या महसुली उत्पन्नावरही परिणाम झाला आहे. यास्तव महापालिकेला सेवा-सुविधा पुरविण्यावर बंधने येत आहेत.
चालू आर्थिक वर्षात 9 मार्चअखेर एकूण 40 कोटी 16 लाख घरफाळा वसुली झाली आहे. अद्यापही चालू मागणीमधील 43 कोटी 85 लाख वसुली व थकबाकीमधील 34 कोटी 17 लाख इतकी रक्कम थकबाकी आहे. घरफाळा विभागाकडून चालूवर्षी मोठ्या थकबाकीदारांना जप्तीपूर्व नोटिसा लागू करण्यात आल्या आहेत. यामधील न्यायप्रविष्ठप्रकरणी विधिज्ञांचा अभिप्राय घेऊन कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ज्या मिळकतधारकांनी अद्याप घरफाळा भरलेला नाही, त्यांनी त्वरित कर भरून सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेच्या घरफाळा विभागाने केले आहे.