राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांची प्रकृती चिंताजनक आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने त्यांची प्रकृती खालावत चालली आहे. लालू प्रसाद यादव यांच्यावर रिम्सच्या पेइंग वॉर्डमध्ये उपचार सुरू आहेत. ते अनेक आजारानी त्रस्त आहेत. त्यामध्ये त्यांची किडनी खराब होत असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. त्यामुळे त्यांचे डायलिसिस करण्याची आवश्यकता असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. लालू प्रसाद यादव यांची किडनी 80 टक्क्यांपेक्षा जास्त खराब झाली आहे. उपचार सुरु असताना सुद्धा त्यांच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा दिसून येत नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, लालू प्रसाद यादव यांच्या सीरम क्रिएटिन लेव्हलची तपासणी मंगळवारी करण्यात आली. त्यांची सीरम क्रिएटिन लेव्हल 3.5 वरून 4.2 झाली आहे. किडनीची कार्य करण्याची क्षमता सीरम क्रिएटिनद्वारे दिसून येते. त्यांच्या किडनीची स्थिती जर अशीच कायम राहिली तर त्याचे लवकरच डायलिसिस करावे लागू शकते, अशी माहिती डॉक्टरांनी दिली. त्यांचा रक्तदाब सामान्य असून रक्तातील साखरेची स्थिती सुद्धा ठीक आहे. पण त्यांच्या औषधांच्या डोसमध्ये आणि आहारामध्ये बदल केले जाऊ शकतात, असे देखील डॉक्टर सांगितले.
लालू यादव हे अनेक आजारांनी ग्रस्त आहेत. त्यांना मधुमेह, रक्तदाब, किडनी, दातांचा त्रास अशा अनेक आजार झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर रिम्सच्या पेइंग वॉर्डमध्ये उपचार सुरू आहेत. त्यांच्यावर रिम्समधील डॉक्टरांच्या निरिक्षणाखाली उपचार सुरु आहेत. काही दिवसांपूर्वी त्याच्या दातांवर रूट कॅनाल ट्रीटमेंट करण्यात आली होती. लालू प्रसाद यादव गेल्या अनेक वर्षांपासून या आजारांनी त्रस्त आहेत. त्यामुळे त्यांनी या आधारावरच जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. या याचिकेवर 11 मार्च म्हणजे उद्या सुनावणी होणार आहे. चारा घोटाळा प्रकरणात लालू प्रसाद यादव हे दोषी असून त्यांना पाच वर्षांची शिक्षा आणि 60 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तुरुंगामध्ये असल्यापासून लालू प्रसाद यादव अनेक वेळा आजारी पडले आहेत आणि त्यांना बऱ्याचदा रुग्णालयात दाखल करावे लागले होते.