ताजी बातमी ऑनलाईन टीम
महानगरपालिका निवडणूक लांबणवीर गेल्या असल्या तरी मनसेने (mns) मात्र या निवडणुकांसाठीची जय्यत तयारी सुरू केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांनी आज पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मराठीचा मुद्दा पुन्हा प्रखरपणे लावून धरण्याचे आदेश दिले. हिंदुत्वाचा मुद्दा सोडला नाही. पण मराठीचा मुद्दाही जोरकसपणे मांडा.
हिंदुत्वाबरोबरच मराठी माणसांची मनसे पुन्हा दिसली पाहिजे, अशा सूचनाच राज ठाकरे यांनी मनसे पदाधिकाऱ्यांना दिल्या. मराठीबाबत फक्त काही ठरावीक नेत्यांनी न बोलता सर्वांनीच त्यावर बोललं पाहिजे, अशा कानपिचक्याही राज यांनी वरिष्ठ नेत्यांना दिल्या. शिवसेनेकडून मराठीचा मुद्दा सुटल्याचं चित्रं असतानाच राज ठाकरे यांनी निवडणुकीची संधी साधून पुन्हा एकदा मराठीचा मुद्दा हाती घेतला आहे. येणाऱ्या काळात मराठीच्या मुद्द्यावरून शिवसेना आणि मनसेमध्ये जुंपण्याची चिन्हे दिसत असून निवडणुकीचा प्रचारही मराठी आणि हिंदुत्वाच्या भोवती फिरणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मनसेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी मीडियाशी संवाद साधला. आजच्या बैठकीत दोन ते तीन विषयांवर चर्चा झाली. मनसेकडून तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्यात येणार आहे. महिलांनी या जयंतीत मोठ्या संख्येने भाग घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शिवाजी पार्कवर हा सोहळा पार पडणार आहे. स्वत: राज ठाकरे या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत. राज ठाकरे येणार म्हटल्यावर शिवाजी पार्कवर मोठी गर्दी होणार आहे, असं बाळा नांदगावकर यांनी सांगितलं.
गुढीपाडव्याला राज गर्जना
गुढीपाडव्याला मनसेचा मेळावा आयोजित करण्यात येत असतो. कोरोनामुळे मागील दोन वर्ष हा मेळावा झाला नाही. आता येत्या 2 एप्रिल रोजी हा मेळावा होणार आहे. हा मेळावा सुद्धा उत्साहात साजरा करायचा आहे. या संदर्भात काही सूचना देण्यात आल्या आहेत, असंही नांदगावकर यांनी सांगितलं.
आमचा एकटा जीव सदाशिव
यावेळी त्यांनी महापालिका निवडणुकांवरही भाष्य केलं. निवडणुका कधी होतील? माहीत नाही. पण निवडणुका होऊ शकतात हे गृहीत धरून निवडणुकांची तयारी पूर्णपणे ताकदीने करायची आहे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. आतापर्यंत आमचा एकटा जीव सदाशिव सुरू आहे, सोबत आले तर सोबत. नाहीतर सोडून निवडणुका लढवू, असं त्यांनी सांगितलं.
ट्रेलरचं रुपांतर पिक्चरमध्ये दिसेल
जी नळावरची भांडण राजकारणात सुरू आहेत ते पाहता जनतेच्या मनामध्ये राज ठाकरे यांच्याबद्दल एक भावना तयार झालेली आहे. जे काही करू शकते फक्त राज ठाकरेच करू शकतात. तुम्ही थोडी वाट पाहा तुम्हाला सुद्धा ट्रेलरचे रुपांतर पिक्चरमध्ये झालेले दिसेल, असंही ते म्हणाले.