आंतरराष्ट्रीय स्तरावरील कब्बडीपटू संदीप नांगल याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. पंजाबमधील जलंदर येथे सोमवारी सायंकाळी चार जणांनी संदीपवर हा गोळीबार करण्यात आला. शाहकोट येथील मल्लियन कालन गावामध्ये एका कब्बडी स्पर्धेमध्ये संदीप सहभागी झाला होता. त्याचवेळी त्याच्यावर हा प्राणघातक हल्ला झाला.
जलंदर पोलिसांचे एसएसपी सतिंदर सिंग माध्यमांना सांगितले की, “चार जण कारमधून आले आणि सामना सुरू असतानाच त्याच्यावर गोळीबार केला. या प्रकरणामध्ये एफआयआर दाखल करुन घेण्यात आला असून आम्ही तपास करत आहोत. शवविच्छेदनानंतरच अधिक माहिती देता येईल.”
संदीप कब्बडी सामन्यासाठी मैदानात उतरला होता. त्याचवेळी चार अनोळखी व्यक्तींनी त्याच्यावर गोळीबार केला. संदीपवर एकूण १० गोळ्या झाडण्यात आला. घटनास्थळी १० गोळ्यांच्या रिकाम्या नळ्या सापडल्या आहेत. संदीपवर हल्ला झाल्यानंतर जखमी अवस्थेत त्याला नाकोडर येथील रुग्णालयात नेण्यात आले.
परंतु, त्याला तिथे मृत घोषित करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणात पोलीस आता तपास करत आहेत. सोशल मीडियावर या हल्ल्याच्या वेळेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यामध्ये गोळीबार करणाऱ्या व्यक्तींबरोबरच गोळीबाराचा आवाज ऐकल्यानंतर सामना पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांची धावपळही दिसून येत आहे. संदीप हा नांगल अंबियान गावातील रहिवाशी होता. संदीप त्याच्या कुटुंबासोबत इंग्लंडमध्ये स्थायिक झालेला. मात्र कब्बडीच्या प्रेमापोटी तो आवर्जून भारतात यायचा. त्याने काही कब्बडीच्या स्पर्धाही स्थानिक स्तरावर सुरु केल्या होत्या.