हिजाब वादावर उच्च न्यायालयाने मंगळवारी निर्णय दिला. हिजाब हा इस्लाम धर्माचा अनिवार्य भाग नाही, शालेय गणवेषाविरुद्ध विद्यार्थी आक्षेप घेऊ शकत नाहीत, असे सांगत हिजाब प्रकरणातील सर्व याचिका न्यायालयाने फेटाळून लावल्या. या पार्श्वभूमीवर शहरात शाळा-कॉलेजमध्ये महिला पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
गेल्या महिन्यात शहरातील सरदार्स हायस्कूल, आरएलएस कॉलेज व सदाशिवनगरातील पॅरोमेडिकल कॉलेज येथे विद्यार्थिनींनी हिजाबसाठी आग्रह धरल्यामुळे गोंधळ माजला होता. शैक्षणिक क्षेत्रातील वातावरणाला धार्मिकतेचा रंग देण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे मंगळवारी निकाला जाहीर होताच शहरातील शाळा-कॉलेजमध्ये पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला. त्यामुळे कुठेही अनुचित प्रकार घडला नाही.