सध्या देशभरात दोन गट पडलेत. एक म्हणजे द काश्मीर फाइल्स चं समर्थन करणारा गट आणि दुसरा म्हणजे ‘द काश्मीर फाईल्स’सिनेमाला विरोध करणारा गट. या सिनेमाच्या बाजूने बोला किंवा त्याच्या विरोधात बोला तुम्ही टीकेचे धनी होताच. अश्यात जर काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांनी ‘द काश्मीर फाईल्स’ सिनेमाला टॅक्स फ्री करण्याची मागणी केल्यावर चर्चा तर होणारच ना… काँग्रेस नेते आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी या सिनेमाला देशभरात टॅक्स फ्री (कर मुक्त) करण्याची मागणी केली आहे. त्यांच्या या मागणीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. भूपेश बघेल यांनी त्यांच्या मंत्रीमंडळातील मंत्री आमदार आणि नागरिकांसोबतसोबत मॅग्नेटो मॉलमध्ये हा सिनेमा पाहिला.
छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी या सिनेमाला देशभरात टॅक्स फ्री (कर मुक्त) करण्याची मागणी केली आहे. “या सिनेमावरचा जीएसटी केंद्राने हटवावा. जेणे करून हा सिनेमा देशभर टॅक्स फ्री होईल”, अशी विनंती त्यांनी पंतप्रधान मोदी यांना केली आहे.
सिनेमा पाहिल्यावर बघेल यांची प्रतिक्रिया
भूपेश बघेल यांनी सिनेमा पाहिल्यावर आपली प्रतिक्रिया दिली. “नुकतंच द काश्मीर फाइल्स सिनेमा बघून परतलो. भाजपच्या पाठिंब्याने चालणाऱ्या सरकारने काश्मिरी पंडितांना रोखण्याचा प्रयत्न केला नाही, तर त्यांना निघून जाण्यास सांगितलं, असं या चित्रपटात दाखवण्यात आलं आहे.तिथं सैन्य पाठवले नाही. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी लोकसभेचा घेराव केला तेव्हा सैन्य पाठवण्यात आलं”, असं भूपेश बघेल म्हणाले.