Sunday, December 22, 2024
Homeमहाराष्ट्रचार्जिंगला फोन लावून बायकोशी गप्पा, 25 वर्षीय तरुणाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

चार्जिंगला फोन लावून बायकोशी गप्पा, 25 वर्षीय तरुणाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

चार्जिंगला लावलेल्या मोबाईलवर बोलताना तरुणाला प्राण गमवावे लागल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. मोबाईल फोन चार्जिंगला लावून तरुण आपल्या बायकोशी बोलत होता, त्यावेळी त्याला विजेचा जोरदार धक्का लागला. बेशुद्ध पडलेल्या तरुणाचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. सध्या मुंबईत राहणारा 25 वर्षीय सुजीत विश्वकर्मा फर्निचरच्या कामासाठी मध्य प्रदेशच्या इंदौरमध्ये गेला होता. त्यावेळी ही घटना घडली.

सुजीत विश्वकर्मा घटनेच्या दुसऱ्याच दिवशी मुंबईला परतणार होता. मात्र आदल्या रात्रीच त्याचा करुण अंत झाला. पत्नीशी फोनवर बोलताना त्याला विजेचा धक्का लागला. इंदौरच्या विक्रम हाईट्समध्ये ही घटना घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चार वर्षांपूर्वी सुजीतचं लग्न झालं होतं. मूळ उत्तर प्रदेशातील हे कुटुंब असून सध्या मुंबई जवळच्या नालासोपारा परिसरात राहतं. इंदौरमध्ये तो फर्निचरचं काम करण्यासाठी गेला होता. मंगळवारी संध्याकाळी काम पूर्ण झाल्यानंतर बुधवारी सकाळीच तो मुंबईला येण्यासाठी निघणार होता. मात्र उशिर झाल्याने त्याला इंदौरमध्येच थांबावं लागलं. जेवल्यानंतर सुजीतने मोबाईल चार्जिंगला लावला आणि तो पत्नीशी फोनवर बोलत होता.

सुजीत विश्वकर्मचा भाऊ संजयने दिलेल्या माहितीनुसार सुजीत आठवडाभरापूर्वी इंदौरच्या शोरूममध्ये फर्निचरच्या कामासाठी तो गेला होता. रात्री सुजीतने मोबाईलचा चार्जर मागितला. त्यानंतर तो दुसऱ्या खोलीत गेला. इलेक्ट्रिक बोर्डमध्ये मोबाईल चार्जिंगला लावून तो फोनवर बोलत होता. त्याचवेळी त्याचा ओरडण्याचा आवाज आला. संजयने खोलीत जाऊन पाहिलं असता तो बेशुद्धवस्थेत पडला होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -