स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी हे राज्यातील महाविकास आघाडी सरकार वर नाराज असून सरकार मधून बाहेर पडण्याच्या तयारीत आहेत. त्याच पार्श्वभमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांना याबाबत विचारले असता त्यांनी यावर भाष्य करत राजू शेट्टी यांच्या शेतकऱ्यांविषयी काही समस्या असतील तर त्यांनी दिल्लीत जंतरमंतर मैदानावर जाऊन आंदोलन करायला पाहिजे असे म्हंटल आहे.
संजय राऊत म्हणाले, राजू शेट्टी हे शेतकऱ्यांचे नेते आहेत, त्यांचेही काही प्रश्न असतात, त्यांनी दिल्लीत जंतरमंतर येथे जाऊन आंदोलन करावे, आम्ही देखील त्या आंदोलनात सहभागी होऊ, कारण शेतकऱ्यांच्या संदर्भात काही धोरणे ही केंद्र सरकारची असतात, त्यामुळे त्यांनी जर असे आंदोलन केले तर आम्ही देखील त्यांच्या पाठीशी राहू, राजू शेट्टी हे झुंजार नेते आहेत, लढवय्ये नेते आहेत, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर ते प्रामाणिकपणे लढत असतात असे राऊत म्हणाले.
दरम्यान, राज्यातील महाविकास आघाडी सरकार कडून निराशा झाली असून येत्या 5 तारखेला होणाऱ्या बैठकीत आपण कठोर निर्णय घेणार आहोत असे विधान राजू शेट्टी यांनी केलं. सत्तेत राहून शेतकऱ्यांचे प्रश्न सुटत नसतील तर अशी सत्ता नकोच आहे अशी भूमिका त्यांनी मांडली. मी आमदारकीच्या आशेवर बसलो नाही, मला आमदारकी नाही मिळाली तरी फरक पडत नाही असं राजू शेट्टी म्हणाले.