आकर्षक सजावटीने सजविलेली पालखी, पारंपरिक लवाजमा, देवीचा अखंड जयघोष यासह हजारो भाविकांची उत्साही उपस्थिती अशा भक्तिमय वातावरणात शुक्रवारी करवीर निवासिनी अंबाबाई देवीचा पालखी सोहळा झाला. कोरोनानंतर मंदिराचे चारही दरवाजे खुले झाल्याने मंदिर परिसरात येऊन आबालवृद्धांनी पालखी सोहळ्यात सहभाग घेतला. यामुळे तब्बल दोन वर्षांनंतर देवीचा आठवड्याचा पालखी सोहळा पूर्ववत सुरू झाल्याबद्दलचे समाधान भाविकांमधून व्यक्त होत होते.
कोरोनामुळे दोन वर्षांपूर्वी मंदिर दर्शनासाठी बंद करण्यात आले होते. तेव्हापासून मंदिरातील सर्व पारंपरिक व धार्मिक विधी प्रतीकात्मक व साधेपणाने आणि मोजक्या मानकर्यांच्या उपस्थित सुरू होते. कोरोनाचा कहर कमी झाल्याने मंदिर टप्प्याने खुले झाले. लोकभवानेचा आदर राखत प्रशासनानेही ई-पास बंद करून मंदिराचे सर्व दरवाजे खुले करण्याचा निर्णय घेतला. यामुळे शुक्रवारी देवीचा पालखी सोहळा दोन वर्षर्ंनंतर भाविकांच्या उत्साही उपस्थितीत पार पडला. लोकांनी हा सोहळा आपल्या मोबाईलमध्ये आवर्जुन साठवून घेतला.
दरम्यान, या आठवड्यात शुक्रवारी धुळवड, शनिवार व रविवार तसेच सोमवारच्या औद्योगिक सुटीमुळे सलग चार दिवस सुट्ट्या आल्या आहेत. यामुळे देशभरातील भाविक-पर्यटक मोठ्या संख्येने कोल्हापुरात दाखल झाले आहेत. यामुळे अंबाबाई मंदिरासह शहरातील सर्वच पर्यटन स्थळांवर गर्दी झाली होती. देवीचा वार असल्याने शुक्रवारी अंबाबाई मंदिरात ओटी भरण्यासाठी तसेच रात्री पालखी सोहळ्यालाही पर्यटकांनी आवर्जून उपस्थिती लावली होती.