ताजी बातमी ऑनलाइन टीम
शेती पंपाच्या मोटर पेटीत करंट उतरल्याने विजेचा धक्का बसून नांद्रे येथील विशाल पाटील या युवकाचा मृत्यू झाला. यावेळी महावितरणच्या या अनागोंदी कारभाराचा पाढा विद्युत निरीक्षकांच्या समोर ग्रामस्थांनी मांडल्याने वातावरण तणावपूर्ण झाले होते. दरम्यान, पोलीस कर्मचारी उपस्थित असल्याने पुढील अनर्थ टळला.
नांद्रे माळ्यातील विशाल चवगोंडा पाटील (वय २०) हा युवक सकाळी साडेआठ वाजता शेतातील बोअरची मोटर सुरु करण्यासाठी गेला होता. त्याने मोटर पेटीच्या हँडलला हात लावला आणि तो तेथेच चिकटला. ही बाब लक्षात येताच शेजारील शेतकऱ्यांनी काठीच्या सहायाने त्याला बाजूला केले. रुग्णालयात नेले असता त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे घोषित करण्यात आले. विद्युत निरीक्षक जयश्री पाटील यांनी पाहणी केली असता सर्व्हिस वायर मधून पेटीत करंट उतरल्याचे लक्षात आले. दरम्यान, जयसिंगपूर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.
एकुलता एक असलेल्या विशालच्या पश्चात आई, वडील, दोन विवाहित बहिणी आहेत. महावितरण कर्मचाऱ्यांच्या कामाबद्दल ग्रामस्थांतून खदखद व्यक्त होत होती. घटनेनंतर अनुचित प्रकार घडू नये, म्हणून पोलीस पाटील प्रशांत नेजकर व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.