देशात तब्बल चाडेचार महिन्यांनी पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे महागाईची झळ आणखी तीव्र होणार आहे. अशातच सरकारने घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरच्या दरात 50 रुपयांनी वाढ केली आहे. त्यामुळे आम आदमीसाठी महागाईचे दिन आले आहे. आजपासून सर्वसामान्य जनतेचा खिसा कापला जाणार आहे.
उत्तर प्रदेशसह पाच राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर इंधनाचे दर वाढतील, असे संकेत देण्यात आले होते. अगदी तसेच झाले आहे. निवडणुका संपताच आता इंधन दरवाढीचा भडका उडाला आहे. घरगुती वापराच्या सिलिंडरच्या दरात 50 रुपयांनी वाढ झाली आृहे. दरम्यान, गेल्या वर्षी 6 ऑक्टोबरला घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात वाढ झाली होती. त्यामुळे महिलांचे किचन बजेट बिघडणार आहे.
खाद्य तेलाच्या किंमती गगनाला भिडल्याने आधीच नागरिक त्रस्त असताना त्यात LPG गॅस सिलिंडरच्या दरवाढीची भर पडली आहे. या दरवाढीमुळे मध्यमवर्गीय आणि सामान्यांवर महागाईची कुऱ्हाड कोसळली आहे.
मुंबईसह इतर प्रमुख शहरात प्रति सिलिंडरचे दर किती?
> मुंबई- 949 रुपये 50 पैसे.
> कोलकाता- 976 रुपये
> चेन्नई- 965 रुपये 50 पैसे.
> लखनऊ- 987 रुपये 50 पैसे.
> पाटणा – 1039 रुपये 50 पैसे.
दुसरीकडे, देशात पेट्रोल-डिझेलच्या दराचा भडका उडाला आहे. पेट्रोल प्रतिलिटर 84 पैसे तर डिझेल प्रतिलिटर 83 पैशांनी महागले आहे. वाढीव दर मंगळवारी सकाळी 6 वाजेपासून लागू झाले आहेत. देशाची राजधानी दिल्लीत पेट्रोलचा दर प्रतिलिटर 96 रुपये 21 पैसे तर डिझेलचा दर 87 रुपये 47 पैसे झाला आहे. मुंबईत सध्या पेट्रोल 109 रुपये 98 रुपये प्रतिलिटर तर डिझेल 94.14 रुपये प्रतिलिटर दराने मिळत आहे.
रशिया आणि युक्रेनमध्ये सुरु असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर जागतिक बाजारपेठेत कच्च तेल अर्थात क्रूड ऑईलचे दर गगनाला भिडले आहेत. क्रूड ऑईल प्रति बॅरेल 112 डॉलरवर पोहोचला आहे. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे.