कोरोना महामारीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत पूर्वी पेक्षा चांगला बदल झाला आहे. परिस्थिती पूर्वपदावर येत असून औद्योगिक क्षेत्रही नव्या उमेदीने उभे राहिले आहे. याचा फायदा रोजगार निर्मितीत होणार आहे. देशात येत्या तीन महिन्यात 38 टक्के खासगी कंपन्या मोठ्या प्रमाणावर कर्मचारी भरती प्रक्रिया राबविणार आहे. तसेच कर्मचाऱ्यांच्या पगारतही वाढ होणार असल्याचा अंदाज एका अहवालानुसार वर्तविण्यात आला आहे. रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्यास बेरोजगारांना मोठा दिलासा मिळणार आहे.
देशात आगामी काळातील रोजगार संदर्भात मॅनपॉवर ग्रुपतर्फे 3.090 कंपन्यांचा सर्वे करण्यात येऊन मते जाणून घेण्यात आली. ‘मॅनपॉवर ग्रुप रोजगार सर्वेक्षण’च्या अहवालानुसार एप्रिल ते जून या तिमाहीत विविध कंपन्यांकडून नोकरभरती राबविण्यात येईल. सर्वेक्षणानुसार भरतीबाबतचा अहवाल तयार करण्यात आला आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा विविध क्षेत्रांची सध्यास्थिती चांगली आहे. मात्र जानेवारी ते मार्च या तिमाहीच्या आधारे पाहिल्यास रोजगार निर्मितीत 11 टक्के घाट होण्याचा अंदाज आहे. तर 55 टक्के कंपन्यांचा अंदाज आहे की, एप्रिल ते जून या तिमाहीत कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होईल. तर 17 टक्के कंपन्यांच्या मते पगारात घट होईल. 36 टक्के कंपन्यांच्या म्हणण्यानुसार पगार आहे तसेच राहतील.
आयटी क्षेत्रात संधी
मॅनपॉवर ग्रुपचे समूह संचालक संदीप गुलाटी म्हणाले, ‘देश कोरोनाच्या संकटातून बाहेर येत आहे. मात्र जागतिक राजकारणातील अस्थिरता आणि चलनवाढ सारखी नवीन आव्हानं आपल्या समोर उभी ठाकली आहे. असे असले तरी देशात माहिती आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात रोजगाराच्या संधी निर्माण होत राहतील. यासह विविध क्षेत्रात कार्यक्षम महिलांचं प्रतिनिधित्व यावर बोलतांन संदीप गुलाटी म्हणाले, आयटी क्षेत्रात महिलांचं सर्वाधिक म्हणजे 51 टक्के प्रमाण आहे. हॉटेल क्षेत्रात 38 टक्के, तर शिक्षण, आरोग्य, समाजकार्य आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये महिलांचं 37 टक्के प्रतिनिधित्व आहे.
बेरोजगारांना मिळणार मोठा दिलासा
‘मॅनपॉवर ग्रुप रोजगार सर्वेक्षण’च्या अहवालानुसार एप्रिल ते जून या तिमाहीत विविध कंपन्यांकडून नोकरभरती राबविण्यात येईल. असे झाल्यास बेरोजगारांसाठी हा मोठा दिलासा ठरेल. कारण कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे अनेक जन बेरोजगार झाले आहे. तर काहींना कमी पगारावर काम करावे लागत आहे. अहवालानुसार, पुढच्या तिमाहीत रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण झाल्यास परिस्थिती बदलत दिलासा मिळेल.