कोल्हापूर उत्तर मतदारसंघाचे आ. चंद्रकांत जाधव यांचे निधन झाल्याने त्या जागेवर पोटनिवडणूक होत आहे. या पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून दिवंगत आ. चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव यांचा आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. यावेळी कोल्हापूरचे पालकमंत्री तथा गृहराज्य मंत्री सतेज पाटील, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, तंत्र आणि उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत, कोल्हापूर दक्षिणचे आमदार ऋतुराज पाटील, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना राजेश क्षीरसागर म्हणाले की, शिवसेनेच्या पक्ष प्रमुखांनी आदेश दिलेत. त्यावरुन या ठिकाणी एवढंच सांगतो की शिवसैनिक करुनच दाखवतो. आम्ही काय करणार म्हणून सांगायचं नसतं. शिवसेनेत पाठीत वार करायची संस्कृती नाही. जयश्री जाधव यांचा विजय कोणत्याही परिस्थितीत होणार, अशी ग्वाही त्यांनी दिली.
कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून दोनवेळा विजयी झालेल्या राजेश क्षीरसागर यांचा २०१९ च्या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार चंद्रकांत जाधव यांनी पराभव केला होता. आता जाधव यांच्या अकाली निधनामुळे पोटनिवडणूक होत आहे. क्षीरसागर यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली होती. तसेच मैत्रीपूर्ण लढतीचा प्रस्ताव दिला होता. मात्र, तो प्रस्तावही पक्षाने फेटाळला. काही शिवसैनिकांच्या घोषणाबाजीनंतर मुख्यमंत्र्यांनी त्यांना मुंबईत बोलावून त्यांची समजूत काढली होती.