तुरंबेजवळील टेकडीवर ग्रामदैवत गहिनीनाथ आणि भैरवनाथ मंदिराचा जीर्णोद्धार सुरू आहे. काल (ता. २१) खोदकाम करताना गुहा आणि दोन खोल्यांचे तळघर सापडले. जमिनीपासून खाली दहा ते बारा फूट अंतरावर तळघर असून, पुढे जाण्यासाठी मार्ग आहेत.जुन्या काळातील हे बांधकाम असून जुन्या विटा दिसून आल्या. याची पुरातत्व विभागाने चौकशी करावी आणि याचे संवर्धन करावे अशी मागणी ग्रामपंचायतीने केली आहे.
भुयारी मार्ग खुला केल्यानंतर जुन्या काळातील अनेक वस्तू दिसून आल्या. अंधारामुळे पुढे जाणे धोक्याचे आहे. आत गेलेल्या तरूणांनी सावधगिरी बाळगत माहिती घेतली. ऑक्सिजनचे प्रमाणही कमी आहे. गुहा आणि खोल्यांची माहिती मिळताच ग्रामस्थांनी गर्दी केली होती. उत्खनन करून चौकशी करावी अशी मागणी सरपंच मयुरी भावके यांनी केली.